चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरण परशुराम घाट वाहतुकीस दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद केल्यानंतर घाटातील काम वेगाने चालू करण्यात आले आहे. १० मेपर्यंत महामार्गाच्या भरावाचे काम पूर्ण होऊन त्यानंतर काँक्रिटीकरणास प्रारंभ केला जाणार आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ११ मेपासून या घाटातील वाहतूक नियमित चालू होईल, अशी माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.
२५ एप्रिलपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी घाटातील काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि कंत्राटदार आस्थापनाला घाट बंदी दिलेली मुदत येत्या १० मे या दिवशी संपत आहे. यापुढील कामासाठी वाढीव मुदत दिली जाणार नसल्याने ११ मेपासून घाटातील वाहतूक नियमितपणे चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.