योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेल्या अनुभूती

१. योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केल्यानंतर वेळोवेळी सूक्ष्मातून सत्संग देणे आणि ‘ते साधकाच्या समवेत असून निर्गुणातून शिकवत आहेत’, अशी अनुभूती येणे

श्री. अतुल पवार

१ अ. नर्मदा नदीत उभे राहून नामजप करतांना गळ्यातील ३ माळांपैकी योगतज्ञ दादाजींनी दिलेल्या माळा गळ्यात तशाच रहाणे आणि अन्य माळ नाहीशी होणे : ‘योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागानंतर मी गुजरात राज्यातील गरुडेश्वर या तीर्थक्षेत्री जानेवारी २०२० मध्ये गेलो होतो. योगतज्ञ दादाजी यांच्याकडून मी या तीर्थक्षेत्राविषयी ऐकले होते. त्यांनी यापूर्वी या ठिकाणी नर्मदा नदीच्या काठी पुष्कळ साधना केली आहे. नर्मदा नदीच्या जवळच प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेबेंस्वामी यांचे सुंदर समाधी मंदिर आहे आणि तेथे जवळच दत्तमंदिरही आहे. मी पहाटे अंघोळ करून समाधी मंदिरात गेलो आणि तिथे थोडा वेळ नामजप केला. तेव्हा मला ‘योगतज्ञ दादाजी माझ्या समवेत सूक्ष्मरूपाने आहेत’, असे जाणवत होते. मी तिथेच त्यांना मनोमन म्हणालो, ‘दादाजी तुम्ही समवेत असल्याची मला काहीतरी प्रचीती द्या.’ त्यानंतर ‘नर्मदा नदीत उभा राहून थोडा वेळ नामजप करूया’, असा विचार करून मी नदीकडे गेलो. नदीमध्ये उभा राहून मी थोडा वेळ नामजप केला. त्यानंतर मी मंदिरातील खोलीवर गेलो. माझ्या गळ्यामध्ये नेहमी ३ निरनिराळ्या माळा असतात. त्यापैकी २ माळा योगतज्ञ दादाजींनी दिल्या होत्या आणि ५ – ६ वर्षांपूर्वी एक रुद्राक्षांची माळ मला अन्य संप्रदायातील एका मित्राने दिली होती. खोलीवर आल्यावर माझ्या लक्षात आले की, ‘माझ्या गळ्यात त्यातील रुद्राक्षांची माळ नाही.’ मी रात्री झोपतांना गळ्यातून माळ काढत असे आणि अंघोळ केल्यानंतर परत गळ्यात घालत असे. पहाटेच्या वेळी मंदिरात नामजप करतांना माझ्या गळ्यात तिन्ही माळा होत्या. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, ‘तुम्ही माझ्या समवेत असल्याची काहीतरी प्रचीती द्या’, असे मीच सकाळी योगतज्ञ दादाजींना म्हणालो होतो. त्याप्रमाणे माझ्या गळ्यातील ३ माळांपैकी केवळ योगतज्ञ दादाजींनी दिलेल्या माळा राहिल्या आणि तिसरी माळ नाहीशी झाली. यावरून ‘योगतज्ञ दादाजी ‘मी तुझ्या समवेतच आहे’, असे सांगत आहेत’, असे वाटले.

१ आ. योगतज्ञ दादाजींनी देहत्यागानंतर एक वर्षापर्यंत स्वप्नात येऊन सत्संग देणे आणि त्यानंतर ‘साधकाने स्वप्नात अडकू नये’, यासाठी स्वप्नात येणे बंद होऊन ते सूक्ष्मरूपाने समवेत असल्याचे जाणवणे : योगतज्ञ दादाजींनी देहत्याग केल्यानंतर एक वर्षापर्यंत, म्हणजे त्यांची पुण्यतिथी होईपर्यंत ते आठवड्यातून एकदा माझ्या स्वप्नात येत असत. स्वप्नामध्ये स्मितहास्य असलेला त्यांचा तोंडवळा दिसणे, मी त्यांच्या समवेत सेवा करत असल्याचे दिसणे, तसेच स्वप्नाच्या माध्यमातून ते काहीतरी शिकवत असल्याचे मला जाणवत असे. विशेष म्हणजे स्वप्न बहुतांश वेळा गुरुवारीच पडत असे आणि तेव्हा काही तरी शुभघटना घडत असल्याचे मी अनुभवत असे. काही वेळा मला जे स्वप्नात दिसले, ते प्रत्यक्षात घडल्याचे मी अनुभवले आहे. स्वप्नाच्या माध्यमातून त्यांनी मला वेळोवेळी सत्संग दिला आणि ‘मी तुझ्या समवेत आहे’, याची प्रचीती दिली. हळूहळू त्यांचे स्वप्नात येणे बंद झाले. ‘मी त्या स्वप्नांच्या पुढील टप्प्याला जायला हवे. त्यात अडकून राहू नये’, असे त्यांना वाटत असावे; म्हणून त्यांनी हळूहळू स्वप्नात येणे बंद केले असावे’, असे मला वाटले. त्यानंतर ते सूक्ष्मातून समवेत असल्याचे मला जाणवत आहे.

२. स्वप्नाद्वारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकच असल्याची प्रचीती येणे

२७.८.२०२१ या दिवशी पहाटे ५.१५ वाजता मला स्वप्न पडले. स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले एका वास्तूमध्ये निवासाला होते. तेथे मी त्यांची सेवा करत होतो. थोड्याच वेळात मला त्यांच्या ठिकाणी योगतज्ञ दादाजीही दिसू लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि योगतज्ञ दादाजी एकमेकांप्रमाणेच कृती करत होते. तेव्हा मला ‘हे योगतज्ञ दादाजी आहेत कि प.पू. डॉक्टर आहेत ?’, हे कळत नव्हते. त्या ठिकाणी योगतज्ञ दादाजींचे साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकही त्यांच्या दर्शनाला येत होते. यावरून मला योगतज्ञ दादाजी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकच असल्याचे लक्षात आले. त्या दोघांमध्ये पुष्कळ प्रमाणात साम्य होते. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एका साधकाच्या माध्यमातून सांगितले. तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, ‘‘गुरुतत्त्व एकच आहे. छान शिकायला मिळाले.’’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक