पुणे – रस्ते अपघातात मुलगा गमावलेल्या अपंग पालकांना हानीभरपाई देण्याचे प्रकरण शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये निकाली काढले. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अपंग पालक लोकन्यायालयाची पायरी चढू शकत नसल्याने न्यायाधिशांनी स्वतः खाली येऊन संबंधितांची आस्थेने चौकशी केली आणि प्रक्रिया मार्गी लावली. मुलाचा वर्ष २०१६ मध्ये अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी हानीभरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे विमा आस्थापनाच्या विरोधात अर्ज दिला होता. हा अर्ज संमत झाल्याने न्यायालयाने अर्जदारांना हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर हे प्रकरण निकाली निघाले. अर्जदार दिव्यांग असल्याने अर्जदाराची स्वाक्षरी घेण्यासाठी स्वतः न्यायाधीश खाली उतरले, त्यांनी अर्जदाराची स्वाक्षरी घेऊन तडजोडीचा आदेश दिला.