नाते जुळले की, कुणालाही आनंद होतो. मग ते प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा मैत्रीचे ! ‘तो क्षण साजरा करावा’, असे प्रत्येकालाच वाटते; परंतु जर हेच नाते तुटले, तर ‘तो क्षण साजरा करावा’, असे कुणाला तरी वाटेल का ? पतीसमवेतचे नाते तुटल्यावर एका अभिनेत्रीने नाते तुटल्याचा क्षण छायाचित्रे काढून साजरा केला. असे करणार्यांना आपण काय म्हणणार ? असे करणे म्हणजे निव्वळ पोरखेळच होय. असा प्रकार सेलिब्रेटींकडून होत असेल, तर आजची तरुणाई यांचाच आदर्श घेणार, यात नवल ते काय ? या अभिनेत्रीने हा आनंद (?) विविध छायाचित्रे काढून आणि ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून मिळवला. या छायाचित्रांमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ देऊन हसतांनाची छायाचित्रे काढली. हातात ‘घटस्फोटित’ (डिव्होर्सड) अशी इंग्रजी अक्षरांची माळही तिने घेतली होती. स्वतःच्या नवर्यासमवेत याआधी काढलेले छायाचित्र हातात घेऊन नवर्याच्या चेहर्याचा भाग तिने फाडलेला दिसत आहे. ही छायाचित्रे पाहून कपाळाला हात मारून घेण्यापलीकडे आपण काय करणार ? यातून सेलिब्रेटींची मानसिकता लक्षात येते.
धर्मशास्त्रसुसंगत कृती न करता विक्षिप्तपणे वागून त्यातून आनंद मिळवला जात आहे. योग्य-अयोग्य यांचे भानच राहिलेले नाही. आतापर्यंत ‘प्री वेडिंग’ (लग्नाआधी), ‘पोस्ट वेडिंग’ (लग्नानंतर) किंवा ‘प्री डिलिव्हरी’ (बाळाच्या जन्माआधी) फोटोशूट (छायाचित्रे) आपण पाहिले होते; पण घटस्फोट झाल्यानंतर छायाचित्रे काढण्याचा प्रकार नक्कीच संतापजनक आणि हिंदु संस्कृती, तसेच समाज यांना विनाशाच्या गर्तेत नेणारा आहे. संवेदनशीलता, समाजभान, संयमी वृत्ती नष्ट झाल्याचेच हे लक्षण आहे. ही छायाचित्रे पाहून येत्या काळातील नवविवाहित जोडप्यांनी अशांचा आदर्श घेतल्यास नवल ते काय ? विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी त्यांच्यात होणारी भांडणेही उद्या अशा छायाचित्रांच्या रूपात व्यक्त केल्यास वेगळे वाटणार नाही.
खरेतर घटस्फोट हा प्रकार हिंदु धर्मात नाही. तो पाश्चिमात्य देशांकडून आलेला आहे. पती-पत्नीने एकमेकांना समजून घेऊन आणि स्वीकारून आयुष्य व्यतित करणे, असे हिंदु धर्म सांगतो. हिंदु धर्माचे पालन केल्यास दोन्ही जिवांचे कल्याणच होते; पण हे कळणार कधी ? भरकटलेल्या तरुणाईला योग्य वाट दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे यांचा पाया निर्माण करायला हवा, तसेच सेलिब्रेटींच्या कृतींचा आदर्श ठेवायचा का ? हेही तरुणाईने ठरवायला हवे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.