महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांचे पत्र
सांगली – येथील शामराव परिसरातील ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूमीत (आरक्षण क्रमांक १९६) भूसंपादक प्रक्रिया चालू आहे. या संदर्भात सांगली येथील माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी ‘ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी; अन्यथा यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होणार आहे’, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले होते. यावर ‘अन्वेषण करून अहवाल सादर करावा’, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरी सांगली येथील शामरावनगर परिसरातील मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्या भूसंपादक प्रक्रियेचे अन्वेषण करून त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रणव कर्पे यांनी नगररचना संचालक आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त यांना पाठवले आहे.