आज ४ मे २०२३ या दिवशी श्री नृसिंह जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी श्री नृसिंह प्रकट झाले. भगवान विष्णूच्या दशावतारातील हा चौथा अवतार ! भगवान श्रीविष्णूचे द्वारपाल जय-विजय हे सनकादिकांच्या शापामुळे भ्रष्ट होऊन दैत्य झाले होते. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष अशी त्यांची नावे होती. श्रीविष्णूने वराहरूप धारण करून हिरण्याक्षाचा वध केला. तेव्हा हिरण्यकश्यपूला अत्यंत क्रोध आला. त्याने आपल्या राज्यांत तप, यज्ञ, वेदपाठ इत्यादी व्रते करण्यास बंदी केली आणि तो अत्यंत उग्र असे तप करू लागला. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यांनी वर दिला की, सृष्टीतील कुणाही पुरुषाच्या हातून तुझा मृत्यू घरामध्ये किंवा बाहेर, रात्री अथवा दिवसा, पृथ्वीवर किंवा आकाशात होणार नाही. वरप्राप्तीनंतर हिरण्यकश्यपू देवादिकांना पुष्कळ त्रास देऊ लागला. त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रल्हाद हा मोठा विष्णुभक्त होता. पित्याने अनेक शिक्षा केल्या, तरी त्याने हरिभक्ती सोडली नाही. शेवटी संतप्त होऊन हिरण्यकश्यपू बोलला, ‘‘सांग तुझा परमेश्वर कुठे आहे ?’’ प्रल्हादने उत्तर दिले, ‘‘तो तर सर्वत्र भरला आहे.’’ यावर हिरण्यकश्यपूने क्रोधाने स्वतःच्या हातांतील गदा जवळच्या खांबावर मारली. त्या क्षणी त्यातून एक सिंहाकृती स्वरूप निघाले. या नृसिंहरूप विष्णूने हिरण्यकश्यपूला पकडून त्याचे पोट फाडून त्यास ठार मारले.
नृसिंहावतार हा ‘परमेश्वराचे सर्वसाक्षीत्व सिद्ध करत असून परमेश्वर स्थिर, चर, पाषाण आदींमध्ये भरून उरला आहे’, याचे तो उदाहरण होय. प्रवृत्तीपर विचारांचे जे लोक असतात, त्यांच्या हातून अनुचित कृत्ये घडतात. त्यांना स्वतःच्या पराक्रमाची घमेंड असते; परंतु पापाचा घडा पूर्ण भरताच त्यांचा नाश अकल्पित रितीने कसा होतो ? हे नृसिंहावतार सिद्ध करत आहे. प्रल्हाद हा या देशात भक्तीचे बी पेरणारा पहिला विष्णुभक्त असून तो कुलाने दैत्य होता, तरी देवांनाही वंद्य झाला. सत्यमार्ग श्रेष्ठ मानून पित्याची अवज्ञा करणारा प्रल्हाद, मातेची अवज्ञा करणारा भरत, बंधूचा पक्ष सोडणारा बिभीषण, गुरूंशी युद्ध करण्यास सिद्ध झालेला भीष्म, मामाचा वध करणारा कृष्ण या सर्वांना श्रेष्ठ मानण्यात येते.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))