विनाशकाले ‘सद्बुद्धी’ !

शरद पवार यांना त्यांचा उत्तराधिकारी न मिळणे, हे त्यांच्या गेल्या ६ दशकांच्या राजकारणाचे ठळक अपयश नव्हे का ?

बुडत्या नौकेत बसायला कुणीही सिद्ध नसतो. तसे करणे,हा आत्मघात ठरतो. त्यामुळे अशा वेळी सर्वांना शहाणपण सुचून ते अशा बुडत्या नौकेच्या बाहेर पटापटा उड्या मारतात. तरीही काही जणांची ‘आमची नौका बुडणार नाही’, अशी पक्की धारणा असते. तथापि जेव्हा नौकेचा ‘कॅप्टन’च नौकेतून उडी मारतो, तेव्हा मात्र नौका बुडणार असल्याची सर्वांची पक्की निश्चिती होते. असेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात २ मे दिवशी घडले. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाचे त्यागपत्र देण्याची घोषणा केली. यामुळे काही नेत्यांमध्ये समाधानाचे, तर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण दिसत होते. पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी पवार यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करत निर्णय मागे घेण्याचा प्रचंड आग्रह केला. तोपर्यंत पवार यांच्या त्यागपत्राची घोषणा राष्ट्रीय बातमी बनली होती. अवघा देश हा गदारोळ पहात होता. आरंभी अजित पवार वगळता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध केला; परंतु नंतर मात्र सर्व नेत्यांनी निर्णय स्वीकारून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घेतली.

नाटकबाजीच नव्हे का ?

वास्तविक कुठलाही संघ संकटात असतांना कर्णधाराने महत्त्वाची भूमिका बजावायची असते. नेमक्या अशा वेळीच जर त्याला त्याचे वय आठवले आणि त्याने कर्णधारपद सोडले, तर त्याने संघाला वार्‍यावर सोडण्यासारखे आहे. शरद पवार यांनी नेमके हेच केले आहे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? पवार हे गेल्या ६ दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रीय आहेत. स्वार्थ साधण्यासाठी कधी, कुठे आणि कसे वागावे ? हे पवार यांच्याइतके अचूक जाणणारा दुसरा नेता नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत बंडाळी चालू आहे. त्यात त्यांच्या पक्षाची सत्ता गेली. त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने पक्षाचा ‘राष्ट्रीय’ दर्जा काढून घेतला. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या अधूनमधून प्रसारित होत आहेत. एकूणच पक्षात चालू असलेली सुंदोपसुंदी ही पक्षाला लागलेली शेवटची घरघर आहे, हे पवार यांनी नेमकेपणाने हेरले आहे. अशात ‘जनतेच्या मनात स्वतःची प्रतिमा मलीन होऊ न देण्याचा स्वार्थ त्यांच्या या त्यागपत्राच्या नाट्यामागे नाही’, असे ठामपणे कसे म्हणता येईल ? पवार स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करतात काय, त्या कार्यक्रमात त्यागपत्राची घोषणा करतात काय, कार्यकर्ते आक्रस्ताळेपणा करतात काय, पवार अगदी निमूटपणे तो पहातात काय आणि नंतर निघून जातात काय, हे सर्व अगदी पूर्वरचित नाटकाच्या संहितेप्रमाणे नाही का वाटत ? त्यातून पवार यांनी स्वतःविषयी भावनात्मक वातावरण तर निर्माण केलेच; पण त्यांचे नेते आणि कार्यकर्ते यांना ‘अद्यापही माझ्याविना कुणीही नाही’, हेच दाखवून दिले आहे. दुसरे म्हणजे पवार हे त्यांच्या त्यागपत्राच्या निर्णयावर ठाम रहातील, याची अजिबात शाश्वती नाही; कारण त्यांचा इतिहासच तसा आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घोषित केला होता; परंतु तेव्हाही कार्यकर्त्यांच्या अशाच आक्रस्ताळेपणानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेत निवडणूक लढवली होती. त्यामुळे उद्या पवार यांनी त्यांचे त्यागपत्र मागे घेतले, तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही; म्हणूनच ‘ही एक प्रकारची नाटकबाजी आहे’, असे म्हणायला वाव आहे.

एकूणच आजचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाटक पहाता, त्यात पवार हे त्यांच्या खेळीत यशस्वी झाले आहेत, हे निश्चित; पण त्यांच्या पक्षाचे काय ? त्यांनी पक्ष वार्‍यावरच सोडला नाही का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राष्ट्रीय दर्जा गमवावा लागल्याची नामुष्की ओढवली असतांना आणि पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा असतांना खरे तर पक्षाच्या बळकटीकरणासाठी नव्याने कंबर कसणे आवश्यक होते. शरद पवार यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर भाकरी फिरवणे आवश्यक होते; पण पवार स्वतःच फिरले आणि वयाचा संदर्भ देत त्यांनी तडकाफडकी त्यागपत्र दिले. काही दिवसांपूर्वी पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यापूर्वी कुणाशीही चर्चा केली नव्हती’, असे म्हटले होते. आज त्याच पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचे त्यागपत्र देण्यापूर्वी कुणाशी चर्चा केली होती ? त्यांच्या नेत्यांना तरी विश्वासात घेतले होते का ? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे, असे सर्वसामान्यांना वाटते. पवार यांच्या उक्तीत आणि कृतीत नेमका भेद असतो, तो हाच !

आत्मचिंतन करणार का ?

आता म्हणे ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. खरे तर त्यांनी अगोदर उत्तराधिकारी नेमायला हवा होता. ज्यांनी २४ वर्षे पक्ष चालवला, तसेच ५६ वर्षे कुठल्या ना कुठल्या सभागृहात जनतेचे प्रतिनिधित्व केले, अशा पवार यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमता येऊ नये, हे आश्चर्यकारक म्हणायला हवे. पवार यांनी अगोदरच स्वतःचा उत्तराधिकारी नेमून तो घोषित केला असता आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले असते, तर आजचे नाटक झाले नसते. दुसरे म्हणजे त्यागपत्र देतांना पवार यांनी ‘त्यांची भूमिका कशी योग्य आहे ? पुढे पक्षाची वाटचाल कशी असेल ?’, हेही पटवून द्यायला हवे होते. ते त्यांनी केले नाही. त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी समिती का नेमावी लागते ? पक्षात त्यांचाच तर निर्णय अंतिम असतो ना ? दुसर्‍या बाजूचा विचार करता त्यांच्याकडे उत्तराधिकारीच नाही, असेही त्यांना सुचवायचे असावे. आतापर्यंत या नाटकाचा पूर्वार्ध झाला असून उत्तरार्ध शेष आहे. आता त्यागपत्र दिल्यानंतर तरी पवार हे ‘आपल्या कार्यकाळात आपण काय काय चुका केल्या ?’, याचे आत्मचिंतन करणार का ? त्यात जे चुकले, त्यासाठी  प्रायश्चित्त घेणार का ? हा खरा प्रश्न आहे. पक्षाच्या विनाशकाळात का होईना, पवार यांना कुठे थांबायचे हे कळले, हीसुद्धा एकप्रकारची सद्बुद्धीच नव्हे का ?