‘बेस्‍ट’ निर्णय !

‘बृहन्‍मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम’ (बेस्‍ट)  यांनी उपक्रमाच्‍या बसगाड्यांमध्‍ये प्रवास करत असतांना ‘भ्रमणभाष (मोबाईल) वापरावर मर्यादा’ आणण्‍याचा स्‍तुत्‍य निर्णय घेतला आहे. बसगाड्यांमध्‍ये प्रवास करत असतांना, इयरफोनविना भ्रमणभाषवर ऑडिओ, व्‍हिडिओ ऐकण्‍यास किंवा बघण्‍यास, तसेच मोठ्या आवाजात भ्रमणभाषवर बोलण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे.

सध्‍या बसगाड्यांमधून प्रवास करणार्‍या सर्वच प्रवाशांकडे भ्रमणभाष असतात आणि सार्वजनिक ठिकाणी त्‍याच्‍या वापरावर काही बंधने नसल्‍याने सहप्रवाशांना त्‍याचा त्रास होतो. काही लोक भ्रमणभाषवर ऑडिओ ऐकतांना किंवा व्‍हिडिओ बघतांना मोठ्या आवाजात ऐकतात, तसेच भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात बोलतात. या सर्व प्रकारांमुळे सहप्रवाशांना याचा त्रास होतो आणि बससेवा सार्वजनिक असल्‍याने इतरांना त्‍याचा त्रास होऊ नये; म्‍हणून परिवहन मंडळाने वरील नियमाचा भंग करणार्‍यांवर मुंबई पोलीस कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

दैनंदिन कार्यालयीन कामाला जातांना मोठ्या शहरांमध्‍ये शक्‍यतो ‘सार्वजनिक वाहतूक’ म्‍हणजेच बस, रेल्‍वे इत्‍यादी सेवांचा प्राधान्‍याने विचार केला जातो. यामध्‍ये ‘स्‍वयंशिस्‍तीच्‍या’ अभावामुळे काही प्रवासी आपल्‍यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना ? याचा विचार करतांना दिसत नाहीत. त्‍यामुळे वरील प्रकार घडतात आणि नाईलाजास्‍तव प्रशासनाला कायद्याचा आधार घेऊन कारवाई करावी लागते. सार्वजनिक ठिकाणी स्‍वतःचे वर्तन कसे असले पाहिजे ? याचेही शिक्षण शालेय जीवनापासून विद्यार्थ्‍यांना द्यायला पाहिजे. जेणेकरून या कृतींमुळे सार्वजनिक आयुष्‍यात कुणाला हानी पोचणार नाही किंवा त्रास होणार नाही, याचा विचार प्रत्‍येक जण करील.

सध्‍या आपण कुठेही गेलो की, कारण नसतांना भ्रमणभाष बघण्‍याची सवय आपल्‍याला लागली आहे आणि या सवयीमुळे वाहन चालवत असतांनाही तो बघण्‍यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्‍यामुळे फक्‍त ‘बेस्‍ट’च नाही, तर शासनाचे सर्व उपक्रम आणि कार्यालये यांमध्‍ये ‘भ्रमणभाष’ वापराच्‍या संबंधित नियमावली लागू करणे आवश्‍यक झाले आहे. यामधून सर्वांचा अमूल्‍य वेळ तर वाचेल आणि स्‍वयंशिस्‍तही लागेल.