पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

मोहिमेच्‍या अंतर्गत गड, दुर्ग, ऐतिहासिक वास्‍तू यांची केली जाणार स्‍वच्‍छता

पुणे – ऐतिहासिक गड, दुर्ग यांची नियमित स्‍वच्‍छता राखण्‍यासाठी ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ ही मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. सप्‍ताहातील एक दिवस गड, दुर्ग यांच्‍या परिसरामध्‍ये स्‍वच्‍छता मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती लोणावळ्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्‍यसाई कार्तिक यांनी दिली. या मोहिमेचा प्रारंभ कार्ला येथील श्री एकविरादेवी गडावरून करण्‍यात आला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल आणि अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्‍या संकल्‍पेतून ही मोहीम राबवण्‍यात येणार आहे.

लोणावळा परिसरातील गड, दुर्ग, ऐतिहासिक स्‍थळे यांच्‍या स्‍वच्‍छता मोहिमेत पोलीस, विद्यार्थी, सामाजिक आणि स्‍वयंसेवी संस्‍था यांचे कार्यकर्ते, अधिवक्‍ता, पत्रकार सहभागी झाले आहेत. या मोहिमेच्‍या अंतर्गत लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची गडांसह कार्ला, भाजे लेणी, लोणावळा परिसरातील पर्यटनस्‍थळे, टायगर पॉईंट, लायन्‍स पॉईंट, राजमाची पॉईंट, भुशी धरण, तसेच लोणावळा शहर या परिसराची स्‍वच्‍छता केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?