कॉ. गोविंद पानसरे यांच्‍याकडील जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत संशयितांना मिळाली पाहिजे ! – अधिवक्‍ता अमोघवर्ष खेमलापुरे

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरण !

कॉ. गोविंद पानसरे

कोल्‍हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांची हत्‍या झाल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली डायरी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने जप्‍त करण्‍यात आली होती. या जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत मिळावी, असे आवेदन न्‍यायालयीन प्रशासनाकडे संशयितांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी केले आहे. त्‍यावर सरकारी अधिवक्‍ता शिवाजीराव राणे यांनी आक्षेप घेतला. या संदर्भात युक्‍तीवाद करतांना संशयितांच्‍या वतीने अधिवक्‍ता अमोघवर्ष खेमलापुरे म्‍हणाले, ‘‘या ‘डायरी’ची प्रत सरकारी पक्षाच्‍या वतीने संशयितांना का देण्‍यात आली नाही ?, याचे कोणतेही सक्षम कारण सरकार पक्षाच्‍या वतीने देण्‍यात आलेले नाही. या डायरीत नेमके काय लिहिले आहे ?, हेही संशयितांना समजणे अत्‍यावश्‍यक आहे.’’

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे. संशयितांच्‍या वतीने अधिवक्‍ता समीर पटवर्धन आणि अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील उपस्‍थित होत्‍या. या प्रकरणी कर्नाटकातील कारागृहात असलेल्‍या संशयितांना २७ एप्रिलला उपस्‍थित केले नसल्‍याने या प्रकरणातील अन्‍य साक्षीदारांची पडताळणी होऊ शकली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मे या दिवशी होणार आहे. या खटल्‍यात एकूण १२ संशयित आरोपी आहेत.