हिंदु राष्ट्र सेनेची पत्रकार परिषदेत मागणी
सोलापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकामधून हिंदूंच्या विजयाचा इतिहास पुराव्यानिशी मांडला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांचे पुस्तक संदर्भासह वाचायला हवे होते. या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदराने वक्तव्य केले आहे. केवळ हिंदु धर्माचा अपमान करण्यासाठीच प्रणिती शिंदे यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकावरून बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने निषेध करत आहोत. प्रणिती शिंदे यांनी क्षमायाचना करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवि गोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी विलास पोतू, आनंद मुसळे, सचिन जोशी, लिंबाजी जाधव आदी उपस्थित होते.
या वेळी रवि गोणे म्हणाले की, हिंदु संघटित नसल्यामुळेच भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आले होते. हिंदूंना संघटित करण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभ्यासपूर्वक ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिला. हा इतिहास प्रणिती शिंदे यांनी समजून घेतला पाहिजे. प्रणिती शिंदे यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी केलेला त्याग लक्षात यावा, यासाठी सावरकरांचे चरित्र त्यांच्या पत्त्यावर पाठवणार आहोत, अशी माहितीही रवि गोणे यांनी या वेळी दिली. प्रणिती शिंदे यांनी ‘पूर्वी मला सावरकरांविषयी आदर होता; पण सहा सोनेरी पाने या ग्रंथात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची मते वाचल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर राहिलेला नाही’, असे विधान केले होते.