अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटक्या नियोजनाने कोल्हापुरकरांचे मन जिंकले !
कोल्हापूर, २३ एप्रिल (वार्ता.) – परशुराम जयंतीचे औचित्य साधून समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त पालखी अन् भव्य शोभायात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल (पेटाळा) येथून प्रारंभ झालेली मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून जाऊन त्याचा समारोप पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे झाला. प्रारंभी शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते भगवान परशुराम आणि पालखी यांचे वेदमंत्रांच्या घोषात पूजन करण्यात आले. भगव्या टोप्या, भगवी वस्त्रे परिधान केलेल्या महिला, डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून, टाळ-मृदुंगाच्या गजरात भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत काढलेल्या शिस्तबद्ध आणि नेटक्या मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे मन जिंकले.
धर्माचे पालन झाले, तरच भारतीय संस्कृती टिकून राहील ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी
आपल्या मार्गदर्शनात शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी म्हणाले, ‘‘परशुराम जयंतीचे औचित्य साधून समस्त ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणासाठी संयुक्त शोभायात्रेचे केलेले आयोजन निश्चितच कौतुकास पात्र आहे. यानिमित्ताने धर्माचे पालन करण्याचे आपले दायित्व वाढले आहे. धर्माचे पालन झाले, तरच भारतीय संस्कृती टिकून राहील.’’
१. ठिकठिकाणी शोभायात्रेचे औक्षण करून, फुले उधळून स्वागत करण्यात आले.
२. शोभायात्रेत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, रथारूढ छत्रपती शाहू महाराज, भगवे ध्वज खांद्यावर घेतलेले वारकरी, संत ज्ञानेश्वर-सोपान-मुक्ताई यांनी भिंत चालवणे इत्यादी देखाव्यांंसह क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, झाशीची राणी, लोकमान्य टिळक, आगरकर, चाफेकर, बाजीराव पेशवे, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, संत रामदासस्वामी यांच्यासारखे संत, राष्ट्रपुरुष यांची वेशभुषा केलेली मुले यांचा समावेश होता. समारोप झाल्यावर पाळणा, आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
३. या शोभायात्रेत कोल्हापूर चित्पावन संघ, करवीर ब्राह्मण सभा, श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळ, करवीर निवासिनी पुरोहित मंडळ, जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद अशा २२ संस्थांचा मुख्य सहभाग होता. यात प्रामुख्याने अधिवक्ता विवेक शुक्ल, सर्वश्री श्रीकांत लिमये, प्रसाद भिडे, शामराव जोशी, नंदकुमार मराठे, मकरंद करंदीकर, संजय जोशी, दिलीप गुणे, रामभाऊ टोपकर, विवेक जोशी, सरोज फडके, विनिता आंबेकर, सचिन जनवाडकर यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे श्री. संभाजी (बंडा) साळोखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल चिकोडे, ‘न्यू एज्युकेशन सोसायटी’चे श्री. नितीन वाडीकर यांसह सहस्रो समाजबांधव उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, तसेच शांतपणे देवता-राष्ट्रपुरुष यांचा जयघोष करत, कोणत्याही प्रकारे ध्वनीप्रदूषण न करता मिरवणूक काढून ब्राह्मण समाजाने इतरांसाठी आदर्श निर्माण केला.
२. उन्हाची वेळ असल्याने मिरवणुकीत सहभागी लोकांना पाण्याच्या बाटल्या देण्यात येत होत्या; मात्र रिकाम्या झालेल्या बाटल्या कुठेही अन्यत्र न टाकता कार्यकर्त्यांनी लगेच जमा केल्या.
३. शोभायात्रेचे औचित्य साधून व्यासपिठावर श्री. भावेकाका आणि श्री. गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली ५० महिलांनी श्रींची पालखी येईपर्यंत सतत मंत्रोच्चार केला.