सार्वजनिक ग्रंथालये आणि वाचन संस्कृती यांच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

चंद्रकांत पाटील

पुणे – सार्वजनिक ग्रंथालये आणि वाचन संस्कृती यांच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. श्री. पाटील यांनी वाचक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचारी आणि ग्रंथप्रेमी यांना जागतिक ग्रंथदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने गेल्या काही मासांत राज्यात वाचन संस्कृती वाढवण्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ, विदर्भातील ७ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी’ पदांची निर्मिती, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये बालकुमार ज्ञानकोपरा निर्मिती, तसेच महत्त्वपूर्ण ग्रंथालयांना आधुनिकीकरणासाठी निधी आदी निर्णय मंत्री श्री. पाटील यांनी घेतले आहेत.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी ६० टक्के अनुदानवाढीचा तातडीने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील १० सहस्र ९१८ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मिळाला आहे. मुलांचा ‘स्क्रीनटाईम’ अल्प करण्यासाठी आणि त्यांना पुस्तकांकडे वळवण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये त्यांच्यासाठी बालकुमार ज्ञानकोपरा निर्माण करण्याची संकल्पना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली जात आहे. राज्यातील ६ विभागांत ६ फिरती ग्रंथालये चालू करण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने राज्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्रंथालय चळवळ ही लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्व समाजाने पुढे यावे !

२३ एप्रिल या ‘जागतिक ग्रंथदिना’च्या निमित्ताने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करावे. समाजात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सर्व ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा. ग्रंथालय चळवळ ही लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्व समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.