मिरजेत १०० वर्षांहून प्राचीन मारुति मंदिरातील मारुतीच्‍या मूर्तीची विटंबना !

याच मारुति मंदिरामध्‍ये एका महिलेकडून मारुतीच्‍या मूर्तीची विटंबना करण्‍यात आली

मिरज – मार्केट परिसरातील अग्‍नीशमन विभागाजवळ असलेल्‍या १०० वर्षांहून अधिक प्राचीन अशा मारुति मंदिरातील मारुतीच्‍या मूर्तीची विटंबना झाल्‍याचे दुपारी लक्षात आले. अज्ञातांनी केलेल्‍या विटंबनेच्‍या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यानंतर मार्केट परिसरातील दुकानदारांनी स्‍वयंस्‍फूर्तीने दुकाने बंद केली. सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ‘जोपर्यंत आरोपी सापडत नाही, तोपर्यंत मिरज शहर बंद ठेवावे’, आवाहन केले आहे. पोलिसांनी कोणत्‍याही अफवेवर विश्‍वास न ठेवण्‍याचे, तसेच हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांना शांततेचे आवाहन केले आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्‍यात कारवाईच्‍या मागणीसाठी जमलेले हिंदुत्‍वनिष्‍ठ

या प्रकरणी मिरज शहरातील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी एकत्र येत मिरज पोलीस ठाण्‍यावर मोर्चा काढला आणि संशयितांना अटक करण्‍याची मागणी केली.

मार्केट परिसरात तणाव वाढू नये म्‍हणून ठेवण्‍यात आलेला पोलीस बंदोबस्‍त

मानसिक स्‍थिती बिघडलेल्‍या महिलेकडून मूर्तीची विटंबना !

मिरजेतील मूर्ती विटंबना मानसिक स्‍थिती बिघडलेल्‍या एका महिलेकडून झाल्‍याचे पोलीस अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाले आहे. पोलिसांनी या महिलेला कह्यात घेतले असून मिरजेतील तणावग्रस्‍त स्‍थिती निवळली आहे.

मूर्तींची विटंबना करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्‍यात येईल ! – सुनील फुलारी, पोलीस महानिरीक्षक, कोल्‍हापूर परिक्षेत्र

मिरज येथील मारुति मंदिरामध्‍ये मूर्ती विटंबनेचे दुर्दैवी घटना घडलेली आहे. पोलिसांनी तत्‍परतेने अन्‍वेषण करून एका महिला आरोपीला अटक केलेली आहे. शहरांमध्‍ये पोलिसांचा चोख बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आलेला आहे. नागरिकांनी कोणत्‍याही अफवांना बळी पडू नये. पुढे रमजान ईद, बसवेश्‍वर जयंती आणि शिवजयंती असे सण साजरे होणार आहेत. ते सण नागरिकांनी शांततेत आणि बंधूभावाने साजरे करावेत. मंदिरातील मूर्तीची विटंबना करणार्‍यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असे कोल्‍हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.