देऊर (जिल्‍हा सातारा) येथे रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एकजण गंभीर घायाळ !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १८ एप्रिल (वार्ता.) – कोरेगाव तालुक्‍यातील देऊर गावात रानडुकरांच्‍या शिकारीसाठी शेतात जिलेटीन पुरून ठेवण्‍ले जाते. एके ठिकाणी रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एक शेतकरी घायाळ झाला आहे. त्‍याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

शेतातील पिकांची हानी करणार्‍या रानडुकरांच्‍या शिकारीसाठी शिकारी वेगवेगळे उपाय करत आहेत. एका शिकार्‍याने रानडुकरांना मारण्‍यासाठी शेतात जिलेटिन पुरून ठेवले होते. तेथीलच भरत रामचंद्र कदम हे शेतकरी शेतातील काम झाल्‍यानंतर एका झाडाखाली ते बसले होते. तेव्‍हा त्‍या झाडाखाली पुरून ठेवलेल्‍या जिलेटीनवर त्‍यांचा पाय पडला आणि स्‍फोट झाला. या स्‍फोटामध्‍ये त्‍यांच्‍या पायाच्‍या पंजाला गंभीर दुखापत झाली. रानडुकरांच्‍या शिकारीसाठी अशा प्रकारे उपाययोजना करणार्‍या शिकार्‍यांचा पोलीस आणि वनविभाग यांनी शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देऊर येथील शेतकरीबांधव करत आहेत.