वाडी (जिल्‍हा नागपूर) येथे नगर परिषदेच्‍या कार्यालयात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

वाडी नगरपरिषद कार्यालय

नागपूर – प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्‍यासाठी निवेदन देण्‍यास गेलेल्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या पदाधिकार्‍यांनी वाडी नगर परिषदेच्‍या कार्यालयात तोडफोड केली. ही घटना १७ एप्रिल या दिवशी दुपारी दीड वाजता घडली. मनसे पदाधिकार्‍यांच्‍या तोडफोडीमुळे कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली आहे.

प्रतिकात्मक चित्र

वाडी नगर परिषदेच्‍या क्षेत्रातील नाली बांधकाम, रस्‍त्‍याची कामे आणि मैदानाची प्रलंबित कामे यांकडे लक्ष वेधण्‍यासाठी मनसेचे काही पदाधिकारी नगर परिषदेच्‍या कार्यालयात गेले होते. मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्‍या कार्यालयात मनसेचे ४-५ पदाधिकारी शिरले. त्‍यांनी डॉ. देशमुख यांच्‍याशी वाद घालून कार्यालयात तोडफोड केली. आसंदी, दूरदर्शन संच, सीसीटीव्‍ही, दरवाजा आणि पटल तोडण्‍यात आले, तसेच धारिकांची फेकाफेक करण्‍यात आली. काही कर्मचार्‍यांनी धाव घेतल्‍यामुळे पदाधिकारी पळून गेले. मनसेचे सचिन टिचकुले आणि धनराज गिरीपुंजे हेही पोलीस ठाण्‍यात पोचले होते. त्‍यांनी मात्र निवेदन देतांना शाब्‍द़िक वाद झाल्‍याने घटना घडल्‍याची प्रतिक्रिया दिली.