भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा कुमारी आणि सौभाग्यवती स्त्रियांनाही ‘श्रीमती’ म्हणण्याचा सल्ला!

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ

मुंबई – भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ‘कोणत्याही सज्ञान स्त्रीचा कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती असा वेगवेगळे उल्लेख म्हणण्यापेक्षा ‘श्रीमती’ म्हणायला काय हरकत आहे ?’, असा अजब सल्ला दिला आहे. १३ एप्रिल या दिवशी सौ. वाघ यांनी याविषयीचे ‘ट्वीट’ केले आहे.

अविवाहित मुलीचा उल्लेख ‘कुमारी’ अथवा ‘कुमारिका’ असा केला जातो, तर  पती जिवंत आहे, त्या स्त्रीचा उल्लेख ‘सौभाग्यवती’ असा केला जातो. संस्कृतीत ‘कुमारी’ आणि ‘सौभाग्यवती’ या शब्दांना त्यांचे विशिष्ट अर्थ आहेत. कुमारी आणि सौभाग्यवती या उल्लेखामागे शास्त्राधार असतांना सौ. चित्रा वाघ यांनी मात्र ‘कुमारी’ आणि ‘सौभाग्यवती’ असलेल्या महिलांचाही उल्लेख ‘श्रीमती’ असा करण्याचा सल्ला दिला आहे.

महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १२ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरता त्यांना ‘विधवा’ऐवजी ‘गंगा भागिरथी (गं.भा.) या शब्दांचा वापर करण्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करून चर्चा करावी, अशी सूचना प्रधान सचिवांना दिली होती. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी वरील सल्ला दिला.

संपादकीय भूमिका

  • शास्त्र, संस्कृती, परंपरा आदींमध्ये मनाने पालट करण्याऐवजी संत, धर्मशास्त्राचे अभ्यासक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे !