गेल्या ३ मासांत पणजी शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ

मागील ३ मासांत ‘पी.एम्.१०’ची मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळली

पणजी शहर प्रदूषित !

पणजी, १२ एप्रिल (वार्ता.) – पणजी शहर मागील ३ मासांत प्रदूषित बनले आहे. शहरात मागील ३ मासांत हवेतील धूलिकणांची (‘पी.एम्.१०’ची -‘इनहेलेबल पर्टीकुलेट मॅटर’ची) मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार पणजी शहरातील हवेचे प्रदूषण ‘समाधानकारक’ आणि ‘प्रदूषण अल्प असणे’ या श्रेणीतून ‘समाधानकारक’ आणि ‘मध्यम  स्वरूपाचे’ या श्रेणीत घसरले आहे.

‘मध्यम’ स्वरूपाचे प्रदूषण म्हणजे प्रदूषणाविषयी संवेदनशील असलेल्या लोकांना अल्प प्रमाणात त्रास जाणवतो आणि ‘समाधानकारक’ स्वरूपाचे प्रदूषण म्हणजे फुफ्फूस अन् हृदय यांविषयी समस्या असलेली लहान मुले आणि वयोवृद्ध यांना अल्प प्रमाणात त्रास जाणवतो. ‘पी.एम्.१०’ची मात्रा १०० ग्रॅम प्रतिमेट्रीक क्युब आढळणे ही धुळीच्या घनतेची कमाल मर्यादा धरण्यात आली आहे. यानुसार पणजी शहरात मागील ३ मासांत पुढीलप्रमाणे प्रदूषण नोंद झालेले आहे. जानेवारीमध्ये एकूण ८ दिवस सर्वेक्षण झाले. २ दिवस कमाल मर्यादा ओलांडली गेली (‘पी.एम्.१०’ची मात्रा एक दिवस १०७, तर अन्य एक दिवस १३३ ग्रॅम प्रतिमेट्रीक क्युब आढळली). फेब्रवारीमध्ये एकूण ९ दिवस सर्वेक्षण केले. ६ दिवस कमाल मर्यादा ओलांडली (‘पी.एम्.१०’ची मात्रा ११३ ते १५८ ग्रॅम प्रतिमेट्रीक क्युब यामध्ये आढळली). मार्चमध्ये एकूण ६ दिवस सर्वेक्षण केले. ४ दिवस कमाल मर्यादा ओलांडली (‘पी.एम्.१०’ची मात्रा ११९ ते १५१ ग्रॅम प्रती मेट्रीक क्युब यामध्ये आढळली).

रस्त्याचे बांधकाम चालू असणे, इमारती पाडण्याचे काम चालू असणे, आगीचा धूर, वाहनांतून सोडण्यात येत असलेली प्रदूषित हवा आदी कारणांमुळे ‘पी.एम्.१०’ची मात्रा वाढली आहे. मागील ३ मासांत प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तत्परतेने उपाययोजना आखल्या आहेत. मंडळाने पणजी महापालिकेला प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कृती करण्याची सूचना केली आहे. पणजी महानगरपालिकेने प्रदूषणावर उपाययोजना म्हणून धूळ नियंत्रण यंत्रणांचा वापर करणे आणि धूळ अल्प करण्यासाठी वारंवार पाण्याचा फवारा मारणे, अशा कृती करणार असल्याचे नागरिकांना सांगितले आहे. पणजी शहर प्रदूषित बनल्याने शहरातील अनेक नागरिकांना श्वासोच्छ्वासाचे त्रास, ॲलर्जी आणि अन्य आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.