दुर्मिळ वनस्पतींसह पक्षीही आढळले !
रामशेज किल्ला
नाशिक – दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले, अशी माहिती ‘शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थे’चे राम खुर्दळ यांनी दिली. ते म्हणाले की,…
१. जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेला रामशेज गड सर्वश्रुत आहे; मात्र अलीकडे गडावर वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच नाशिक येथील ‘शिवकार्य गडकोट’च्या माध्यमातून रामशेज गडावर मोहीम राबवण्यात आली.
२. या वेळी दुर्गसंवर्धकांनी रामशेजच्या कड्याकपारींचा चहूबाजूंनी अभ्यासात्मक शोध घेतला. त्यात एकूण ११ गुहांसह दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष आणि विविध पक्षी आढळले. कडाक्याच्या उन्हातही दुर्गसंवर्धकांनी ३ गट सिद्ध करून ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यापुढे या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल.
३. नाशिकच्या ‘शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थे’च्या मोहिमेत रामशेजच्या सर्व बाजूंनी ऐतिहासिक, नैसर्गिक पाऊलखुणा आणि दुर्मिळ जैवविविधतेचा शोध लागला. ११ गुहांसह मध्यभागी असंख्य कातीव दगड आणि गोलाकार दगड आढळले.
४. रामशेज युद्धात वापरलेले दगड आणि गोटे अधिक प्रमाणात गडावर दिसतात, तर बांधकामाचे असंख्य दगड घळीत पडलेले आहेत. गडाच्या चहूबाजूंनी पिंपळ, बाभूळ, काटे साबर, भोकर, देवस, अडुळसा आणि गुर्तुली शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, कोरफड, साबर, हिवर सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा, तसेच पश्चिम पोटात वनविभागाने लावलेली बांबू आणि साग यांची काही झाडे आढळली. यामध्ये बहुतांशी दुर्मिळ वनौषधी आहेत. काही फुले, फळे देणारे आणि काही जाळी, कुंपण सिद्ध करणारे वृक्ष आहेत.
५. प्रतिवर्षी लागणार्या वणव्यामुळे दुर्मिळ वनस्पतींसमवेत येथील मोर, दुर्मिळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्थापित होत आहेत. याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
६. येथे वणवा कसा लागतो, याचा शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी दुर्ग आणि वृक्षमित्र यांनी या वेळी केली.
‘गुहेमध्ये सैनिक टेहळणीसाठी बसू शकतील आणि वन्यजीवही आश्रयास बसू शकतील, अशा त्या गुहा आहेत. आजूबाजूला असणारे दगडगोटे पहाता युद्धात शत्रूवर फेकलेले हे दगड असू शकतात. रामशेज गड ‘राज्य संरक्षित स्मारक’ करण्याकडे राज्य पुरातत्व विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे. याविषयी पाठपुरावा करणे आवश्यक आहे’, असे ऐतिहासिक वास्तू अभ्यासक समितीचे मनोज अहिरे यांनी सांगितले.