तुलसी पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांची घोषणा !
आगरा (उत्तरप्रदेश) – तुलसी पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका धार्मिक कार्यक्रमामध्ये ‘वर्ष १९९० मध्ये रामभक्तांच्या झालेल्या अत्याचारांचा सूड घेतला जाईल’, असे विधान केले आहे. ‘मी कोणताही सौहार्द बिघडवत नाही. मी उघडपणे सांगतो की, ज्याला भारतात रहायचे आहे, त्याने ‘वन्दे मातरम्’ म्हटले पाहिजे’, असेही ते म्हणाले. वर्ष१९९० मध्ये श्रीरामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कारसेवेच्या वेळी देशभरातून अयोध्येत गेलेल्या कारसेवकांवर तत्कालीन मुलायमसिंह यादव यांच्या सरकारने गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. त्यात मोठ्या संख्येने कारसेवक ठार झाले होते. त्यांचे मृतदेह शरयू नदीत फेकण्यात आले होते.
स्वामी रामभद्राचार्य पुढे म्हणाले की, आता याचना होणार नाही, तर रण आणि भीषण महासंग्राम होणार आहे. वर्ष १९९० मध्ये झालेल्या अत्याचार आम्ही विसरलेलो नाही आणि विसरणारही नाही. आम्ही कुणाच्याही धर्मग्रंथांचा अवमान केला नाही; मात्र आमच्या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात आला. हिंदुत्वाचा अवमान झाला. निःशस्त्र रामभक्तांवर गोळ्या झाडण्यात आल्या. शरयू नदी लाल झाली. मी अंध असतांना मला त्या वेळी अटक करून मारहाण करण्यात आली. माझा हाताचा अस्थिभंग झाला होता. आम्हाला अशी समरसता नको आहे. आम्हाला ‘मिले मुलायम काशीराम, हवा में उड़ गए जय श्री राम’ असे ऐकवून दाखवण्यात आले; मात्र आम्ही काही बोललो नाही. आता आम्ही ‘मरे मुलायम-काशीराम, प्रेम से बोलो जय श्री राम’, असे म्हटल्यावर तुम्हाला वाईट का वाटले ?