पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती जाणून घेतांना डावीकडून सौ. संजना मांडके, कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि माहिती सांगतांना श्री. राज कर्वे

रामनाथी – मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात. श्री. राज कर्वे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. ह.भ.प. संदीप मांडके आणि सौ. मांडके यांनी जिज्ञासेने कार्य जाणून घेतले. श्री. उदय बडगुजर यांनी कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांचा या वेळी सत्कार केला.

अभिप्राय

१. कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके : आश्रमात सात्त्विक अनुभूतीची परिसीमा अनुभवली, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची तळमळ सर्व साधकांमध्ये दिसली. आश्रमातील सात्त्विक महाप्रसादाने आनंद मिळाला. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून सात्त्विक अनुभूती आल्या. गोपाळकृष्णाचे (श्रीकृष्णाचे) चित्र पाहिल्यावर ‘दुष्टच्रक घालवण्यासाठी सुदर्शनचक्र फिरत आहे आणि आता श्रीकृष्ण ते सोडण्याच्या सिद्धतेत आहे’, असे जाणवले.

२. सौ. संजना मांडके : आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. पुष्कळ नवीन गोष्टी पहायला मिळाल्या.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक