गोवा सरकारकडून १५९ माजी खाण लीजधारकांना नोटीस

एक मासात खाण लीजक्षेत्र रिकामे करा !

(लीज म्हणजे काही ठराविक काळासाठी भूमी वापरण्यास देण्याचा करार)

एक मासात खाण लीजक्षेत्र रिकामे करा – गोवा प्रशासन

पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – खाण खात्याने लीजची मुदत संपल्याने १५९ माजी खाण लीजधारकांना लीजक्षेत्र सोडण्यासाठी आणखी एक मासाची समयमर्यादा दिली आहे, अन्यथा ‘माईन्स आणि मिनरल’ कायद्याच्या अंतर्गत लीजक्षेत्रातील यंत्रसामग्रीसह लीजक्षेत्र कह्यात घेण्याची चेतावणी खात्याने दिली आहे. यासंबंधी खाण खात्याने ३ एप्रिल या दिवशी आदेश प्रसिद्ध केला होता; परंतु आता यासंबंधी सार्वजनिक नोटीसही बजावली आहे.

खाण लिजांची मुदत ३१ मार्च २०२० या दिवशी संपुष्टात आली होती आणि सरकारने लीजधारकांना त्यांचे संबंधित लीजक्षेत्र सोडण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. मागील सूचनेनंतर ६ मासांचा काळ उलटला आहे आणि सरकारने त्यांना आणखी एक मासाचा अवधी दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार राज्यातील सर्व खाणींवर राज्य सरकारचे नियंत्रण असेल आणि सर्व खाणी राज्य सरकार चालवणार आहे.