सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय !
पुणे – परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी वेगाने होऊन निकाल लवकर घोषित करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने घेतला आहे. उत्तरपत्रिकांच्या ‘ऑनलाईन’ मूल्यांकनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाणार आहे. याविषयी माहिती विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी दिली.
विद्यापीठ संकुलात साधारण ६ सहस्रांहून अधिक विद्यार्थी, तर संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे ६० सहस्र विद्यार्थी आहेत. पुढील टप्प्यात इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ऑनलाईन पद्धतीने मूल्यांकन करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासूनच करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरळीत होणे, परीक्षा आणि निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘डिजिटल’ पद्धतीने करून निकाल जलदगतीने घोषित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले की, डिजिटल मूल्यांकनात परीक्षेनंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत सिद्ध करून प्राध्यापकांच्या ‘ऑनलाईन’ खात्यात पाठवण्यात येईल. प्राध्यापकांनी ती उत्तरपत्रिका ‘ऑनलाईन’ पडताळल्यावर गुणांच्या नोंदी होतील. ही माहिती त्याच वेळी पुन्हा विद्यापिठाकडे परत येईल. अशा पद्धतीने इतर विषयांचे गुण आल्यानंतर लगेचच ‘ऑनलाईन’ गुणपत्रिका प्रसिद्ध करता येईल. त्यानंतर विद्यापिठाकडून गुणपत्रिकांची छपाई करून विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शेवटच्या विषयाची परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांतच निकाल प्रसिद्ध करणे शक्य होईल. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठासारख्या काही विद्यापिठांत उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा निकाल अल्प वेळेत घोषित होतो.