इटलीमध्ये संभाषणासाठी इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांवर बंदी घालण्यात येणार !

८९ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार !

इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलो

रोम (इटली) – इटली सरकार लवकरच देशात इंग्रजी भाषेच्या वापरावर बंदी घालणार आहे. जर कुणी इंग्रजीत किंवा अन्य विदेश भाषांमध्ये संभाषण केले किंवा त्याचा वापर केला, तर त्याला दंड भरावा लागणार आहे. या संदर्भातील वृत्त सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.

१. इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली पार्टी’ने संसदेत नवीन विधेयक सादर केले आहे. त्यानुसार इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांमध्ये संभाषण करण्यावर बंदी असणार आहे. जर कुणी या भाषांमध्ये संभाषण करतांना सापडला, तर त्याच्याकडून १ लाख ‘युरो’चा (युरो म्हणजे युरोपीय देशांतील चलन) दंड (अनुमाने ८९ लाख रुपये) वसूल केला जाणार आहेत.

२. इटलीच्या नेत्या फॅबियो रामपेली यांनी सांगितले की, या विधेयकात म्हटले आहे की, विदेशी भाषांच्या वापरामुळे इटलीच्या भाषेला न्यून (कमी) लेखण्यात येते. हे विधेयक अशा वेळी मांडण्यात आले आहे की, आता ब्रिटन युरोपीय संघाचा सदस्य नाही.