चिपळूण येथील हिंदु युवतीचा धर्मांध कुटुंबियांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अतोनात छळ !

  • मसूद रज्जाक शाहला अटक

  • पोलिसांकडून मात्र धमकी देऊन लाखो रुपये उकळणार्‍या कुटुंबियांवर अद्याप कारवाई नाही !

चिपळूण, १ एप्रिल (वार्ता.) – येथील धर्मांध मसूद रज्जाक शाह याच्याकडून जिवे मारण्याची धमकी आणि त्याच्या कुटुंबियांकडून इस्लाम धर्म स्वीकारणे, आर्थिक मागणी पूर्ण करणे यांसाठी होणारी मारहाण अन् मानसिक छळ याला त्रस्त होऊन एका हिंदु युवतीने येथील पोलीस ठाण्यात २४ मार्च २०२३ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर धर्मांध मसूद याला अटक करण्यात आली आहे; मात्र हिंदु युवतीचा छळ करणार्‍या आणि तिचे पैसे लाटणार्‍या कुटुंबियांच्या विरोधात पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांकडून पोलिसांविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. (युवतीचा छळ करणार्‍या धर्मांध कुटुंबियांवर कोणतीही कारवाई न करणारे पोलीस हिंदूंना न्याय मिळवून देतील का ? अशी कुणाला शंका आल्यास त्यात चुकीचे काय  ? – संपादक) चिपळूण न्यायालयाने मसूद याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१. येथील एका हिंदु युवतीची (वय २५ वर्षे) वर्ष २०१७ मध्ये मसूद रज्जाक शाह नावाच्या मुसलमान युवकाशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले आणि मसूदकडून हिंदु युवतीला विवाहासाठी तगादा चालू झाला.

२. विवाहानंतर मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल आणि मुसलमान होण्याची इच्छा नसल्याने हिंदु युवतीने विवाहास नकार दिला; मात्र ‘विवाह झाल्यावरही तू हिंदूच रहाशील’, असे आश्वासन मसूद याने दिले.

३. मसूद याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कुटुंबियांचा विरोध असतांनाही हिंदु युवतीने वर्ष २०१८ मध्ये मसूदशी इस्लामपद्धतीने विवाह केला. (‘मेरा अब्दुल वैसा नही’, असे समजून त्यावर विश्वास ठेवणार्‍या युवती या प्रकरणातून शिकतील तो सुदिन ! – संपादक)

४. विवाहानंतर मसूद आणि त्याच्या कुटुंबियांकडून युवतीवर अनेक निर्बंध लादण्याचे प्रकार चालू झाले. तिला उच्च शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले. ‘घर आणि मुले जोपासणे’, हेच तुझे काम आहे. ‘तू हिंदु असूनही आम्ही तुला मुसलमान कुटुंबात घेतले, हेच तुझ्यावर मोठे उपकार केले आहेत’, असे सांगून मानसिक छळ मसूदचे कुटुंबीय करू लागले.

५. युवतीने इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी तिचा शारीरिक छळही चालू केला आणि माहेरवरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला.

६. या सर्व त्रासाला कंटाळून युवतीने तिच्या आईकडे हा प्रकार सांगितला. आईने रहात्या घरावर एच्.डी.एफ्.सी. बँकेकडून १४ लाख रुपये कर्ज काढून ते मसूद (पती), नसीमा रज्जाक शाह (सासू), काजिम रज्जाक शाह (दीर), निकित काजीम शाह (जाऊ), फैजिया नाजिम शाह (जाऊ) यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ठराविक रक्कम विभागून जमा केले. हिंदु युवतीच्या आईने हे पैसे ‘स्वत:च्या मुलीचा छळ थांबेल’, ही भाबडी आशा ठेवून केले.

७. त्यानंतर पुन्हा सासू नसीमा हिने ‘मसूदला व्यवसाय करण्यासाठी दीड लाख रुपये हवे आहेत’, असे सांगून पुन्हा युवतीचा छळ चालू केला. त्यानंतर युवतीच्या आईने पुन्हा उसने पैसे घेऊन १ लाख रुपये दिले; मात्र एवढे करूनही या धर्मांध कुटुंबाने हिंदु युवतीचा शारीरिक आणि मानसिक छळ चालूच ठेवला.

८. पती मसूदने हिंदु युवतीला जिवे मारण्याची धमकी दिली. यात स्वत:च्या जिवाचे बरे वाईट होण्याची तीव्रता जाणवल्याने युवती तिच्या नातेवाइकांकडे परत आली.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आदेश

या हिंदु युवतीस १ मुलगा (वय ३ वर्षे ६ मास ) आणि मुलगी (वय १ वर्ष) असून ही दोन्ही मुले पती मसूद शाह याच्या अधीन असून त्यांचा ताबा मिळावा, यासाठी पीडित युवतीने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगास निवेदन दिले. यावर आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ‘मुलांचे वय पहाता आणि मसूदच्या कुटुंबियांकडील असुरक्षिततेचे वातावरण असून या स्थितीत पोलीस यंत्रणेने नोंद घेऊन मुलांच्या सुरक्षिततेविषयी माहिती द्यावी’, असे आदेश दिले आहेत.

जातीवरून अश्लाघ्य शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी !

पीडित हिंदु युवती ही चांभार समाजातील असून धर्मांध मसूद आणि त्याचे कुटुंबीय पीडितेला ‘चांभारडे’ असे हिणवत. ‘चप्पल शिवणारे तुम्ही आमच्यात येऊनही तुला अक्कल आलेली नाही’, असे बोलून मानसिक छळ करत. पती मसूद युवतीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर पाळत ठेवत असे, तसेच मारहाण करत असे. त्याने तिला जिवे मारण्याचीही धमकी दिली.

चिपळूण पोलिसांच्या कारवाईची प्रक्रिया संशयास्पद !

धर्मांध सासू, दीर, जावा यांच्या विरोधात जातीवाचक अपशब्द वापरणे, शारीरिक आणि मानसिक छळ यांविषयीची तक्रार करून ७ दिवस उलटूनही पोलिसांनी मसूद वगळता कुणालाही अटक केलेली नाही. याचा गैरलाभ घेऊन सासू, दीर आणि दोन्ही जावा यांनी न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला. या निकालात न्यायालयाने ‘पोलीस कोठडी देऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही’, असे नमूद केले आहे. जातीवाचक अपशब्द वापरणे आणि छळ, हा गुन्हा नोंद असूनही पोलिसांनी अटक न केल्याने आरोपींना जामीन मिळवण्यास वेळ मिळाल्याने एकूणच पोलीस कारवाईविषयी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना !
  • लव्ह जिहादच्या दुष्टचक्रात सापडलेल्या आणि ‘श्रद्धा वालकर’ होण्यापासून वाचलेल्या अशा युवतींसाठी शासन आतातरी जिहाद्यांच्या विरोधात कायदा करणार का ?