त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थानातील ‘व्‍हीआयपी पेड’ दर्शन बंद करा !

भारतीय पुरातत्‍व विभागाचे पत्र

नाशिक – त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान हे केंद्रीय संरक्षित स्‍मारक असल्‍यामुळे येथे चालू करण्‍यात आलेले ‘व्‍हीआयपी पेड’ दर्शन (पैसे घेऊन दिले जाणारे दर्शन) चुकीचे असून ते प्राचीन स्‍मारके आणि पुरातत्‍व स्‍थळे अन् अवशेष कायद्याच्‍या तरतुदींच्‍या विरोधात आहे. त्‍यामुळे ते तात्‍काळ बंद करावे, तसेच यासह विविध सूचना असलेले पत्र भारतीय पुरातत्‍व विभागाने त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान ट्रस्‍टच्‍या अध्‍यक्षांना पाठवले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिराला भारतीय पुरातत्‍व विभागाचे डी.एस्. दानवे, दीपक चौधरी आणि सुप्रिटेंडिंग आर्कियॉलॉजिस्‍ट  (अधीक्षक पुरातत्‍व शास्‍त्रज्ञ) यांच्‍या समितीने १५ मार्च या दिवशी भेट देऊन पहाणी केली. त्‍यात त्‍यांना आढळलेल्‍या काही गोष्‍टींविषयी १६ मार्च या दिवशी त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान ट्रस्‍टच्‍या अध्‍यक्षांना पत्र पाठवण्‍यात आले आहे.

पत्रामध्‍ये म्‍हटले आहे की,…

१. महाशिवरात्रीसाठी मंदिराच्‍या परिसरामध्‍ये उभारण्‍यात आलेले अडथळे आणि तात्‍पुरती दर्शनबारी हटवण्‍यात यावी, तसेच मंदिर परिसरामध्‍ये ठिकठिकाणी दानपेट्या आहेत. त्‍या हटवण्‍यात याव्‍यात, तसेच दानाची रक्‍कम जमा करण्‍यासाठी उभारण्‍यात आलेल्‍या तात्‍पुरत्‍या केबिनही हटवण्‍यात याव्‍यात.

२. मंदिराच्‍या वायव्‍य कोपर्‍यामध्‍ये काही बिनकामाचे सामान ठेवले आहे, ते तातडीने हटवण्‍यात यावे.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात चालू करण्‍यात आलेल्‍या पेड दर्शनाविषयी उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रलंबित असून न्‍यायालयाकडून याविषयी न्‍याय मिळेल, याची निश्‍चिती आहे. पुरातत्‍व विभागाने केलेल्‍या सूचनेची कार्यवाही आवश्‍यक आहे, असे याचिकाकर्त्‍या ललिता शिंदे यांनी म्‍हटले आहे.

‘पेड दर्शन’ ऐच्‍छिक असल्‍याचे विश्‍वस्‍तांचे मत !

‘हे पत्र अद्याप आमच्‍या बघण्‍यात आलेले नाही. त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्‍ये चालू करण्‍यात आलेले पेड दर्शन हे ऐच्‍छिक असून याविषयीचा निर्णय न्‍यायालयामध्‍ये प्रलंबित आहे. त्‍यामुळे त्‍याविषयी आताच काही निर्णय घेणे उचित होणार नाही’, असे त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थानचे विश्‍वस्‍त प्रशांत गायधनी यांनी म्‍हटले आहे.