३०.१०.२०२२ (कार्तिक शुक्ल षष्ठी) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनपकाका (वय ७४ वर्षे) यांनी देहत्याग केला. दुसर्या दिवशी त्यांचा देह रामनाथी आश्रमातील साधकांना अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. त्या वेळी मी दर्शनाला गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
२७.३.२०२२ (चैत्र शुक्ल षष्ठी) या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. पू. पद्माकर होनप यांच्या अंतीमदर्शनाच्या वेळी जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती
अ. आश्रमातील वातावरण एकदम स्थिर वाटत होते.
आ. पू. होनपकाका यांच्या पार्थिवातून चैतन्य आणि शांती यांची वलये प्रक्षेपित होत होती.
२. पू. होनपकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
२ अ. नम्रता : पू. काकांच्या बोलण्यात नम्रता जाणवायची.
२ आ. मितभाषी : पू. काका अल्प बोलत असत. त्यांचा स्वभाव मितभाषी होता.
२ इ. आज्ञाधारक : काका नोकरीतून निवृत्त होऊन साधारण वयाच्या ६० वर्षांनंतर रामनाथी आश्रमात आले आणि त्यानंतर त्यांना संतपद प्राप्त झाले. प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांना भारतातील वेगवेगळ्या भागात जाऊन सेवा करायला सांगितली. त्यांनी ती सेवा चांगल्या प्रकारे केली.
२ ई. अहंशून्यता : ते सरकारी नोकरीत असतांना ‘लेखापाल’ या मोठ्या पदावर होते; पण त्यांनी ते फारसे कुणाला सांगितले नाही. त्यांना कोणतीही सेवा मिळाली, तर ते ती ‘गुरुसेवा’ म्हणून स्वीकारत होते.
२ उ. सेवाभाव : कै. पू. (सौ.) होनपकाकूंची प्रकृती बरी नव्हती. त्या वेळी पू. काकांचे स्वतःचेही वय अधिक होते, तरी त्यांनी कु. दीपाली (मुलगी) आणि श्री. राम (मुलगा) यांच्यासह शेवटपर्यंत काकूंची सेवा मनोभावे केली.
२ ऊ. सहनशीलता : पू. काकांना साधारण चार वर्षांपासून कर्करोग होता. या ४ – ५ वर्षांत त्यांना दोन-तीन शस्त्रकर्मांना सामोरे जावे लागले, तसेच ‘केमोथेरपी’च्या (‘कॅन्सर’च्या (कर्करोगाच्या) पेशींना मारण्याची उपचारपद्धत) पुष्कळ मात्रा (डोस) त्यांना घ्याव्या लागल्या. ‘केमोथेरपीमुळे’ त्यांना पुष्कळ त्रास सहन करावे लागले; पण त्या त्रासाचा उल्लेख ते करत नव्हते.
२ ए. नामजपादी उपाय : प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यावर अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांसाठी पू. काका नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी त्यांना ४ – ५ घंटे सतत उपाय करावे लागत होते, तरीही पू. काका न कंटाळता ते उपाय करत होते. पू. काका समष्टीसाठीही नामजप करत होते.
२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
१. प.पू. डॉक्टरांप्रती त्यांचा पुष्कळ भाव होता. प.पू. डॉक्टरांचे नाव घेतले, तरी त्यांचा भाव जागृत होत असे.
२. ‘प.पू. डॉक्टरच हेच आपले सर्वस्व आहेत’, असा त्यांचा भाव होता.
– श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |