प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असलेले देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !      

श्री. निनाद गाडगीळ

१. प्रेमभाव  

अ. ‘श्री. निनाद गाडगीळ (निनाददादा) नेहमी येता-जाता साधकांची विचारपूस करतो. तो नेहमी समारून येणार्‍या साधकाला स्मित करून प्रतिसाद देतो. अशा लहान लहान कृतींमधून त्याचा साधकांविषयीचा प्रेमभाव व्यक्त होतो.

आ. त्याच्याकडे त्याच्या संपर्कात असलेल्या साधकांच्या वाढदिवसाच्या नोंदी आहेत. तो न विसरता त्यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतो.

२. मनमिळाऊ आणि सर्वांचा आधार असणे

वर्ष २०१३ मध्ये मी एक नवीन सेवा शिकत होते. तेव्हा निनाददादाशी माझा परिचयसुद्धा नव्हता, तरीही त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे माझी त्याच्याशी लवकर जवळीक झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच त्याच्याशी जवळीक आहे. कुठलेही साहाय्य हवे असल्यास मनात प्रथम निनाददादाचेच नाव येते. सर्वांना त्याचा नेहमीच आधार वाटतो.

३. व्यवस्थितपणा

दादामध्ये ‘व्यवस्थितपणा’ हा गुण पुष्कळ आहे. त्याचे कपडे नेहमीच इस्त्री केलेले असतात. मी कधीच त्याला अव्यवस्थित राहिलेले पाहिले नाही. त्याचा सेवेचा खणही व्यवस्थित असतो. त्याच्याकडे कधीही कोणतीही संगणकीय धारिका मागितली; तरी ती त्वरित मिळते.

अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर

४. इतरांना सेवेत साहाय्य करणे

त्याला जे येते, ते त्याने नेहमीच इतरांना शिकवून स्वावलंबी केले. त्यामुळे मला त्याच्याकडून सेवेतील पुष्कळ बारकावे शिकता आले. आम्ही करत असलेल्या सेवेत कोणतीही अडचण असेल, तर तो स्वतः लक्ष द्यायचा. त्यामुळे सेवेत अडचणी आल्या, तरी मला कधी त्यांचा ताण आला नाही.

५. सेवेची तळमळ

दादा प्रत्येक सेवा झोकून देऊन करायचा. आश्रमातील सेवांची व्याप्ती अधिक असल्याने तो रात्री उशिरा सेवा पूर्ण करायचा, तरीही ‘दुसर्‍या दिवशी त्याने कधी अतिरिक्त विश्रांती घेतली आहे’, असे केले नाही.

६. अभ्यासू वृत्ती  

६ अ. ‘एका सूत्राचा आश्रमातील अन्य साधकांच्या दृष्टीने विचार करायला हवा’, हे श्री. निनाद याच्या व्यापक विचारामुळे लक्षात येणे : एकदा अधिकोषातील एका प्रक्रियेविषयी नवीन सूत्र आले होते. त्याविषयीची प्रक्रिया करणे किचकट होते. जेव्हा मला हे सूत्र कळले, तेव्हा मी केवळ माझ्याशी संबंधित असलेल्या सेवेच्या संदर्भातच त्या सूत्राचा अभ्यास करत होते. त्या वेळी दादाने सांगितले, ‘‘या सूत्राचा आश्रमातील अन्य साधकांच्या दृष्टीने विचार करायला हवा.’’ ‘त्याच्या या व्यापक विचारामुळे हे त्याच्या लक्षात आले’, असे मला वाटले.

६ आ. ‘प्रत्येक सेवेचा बारकाईने कसा अभ्यास करायचा ?’, हे शिकायला मिळणे : निनाददादाकडे आश्रमातील पुष्कळ सेवा येतात. त्यातही व्यक्तीनुरूप वेगवेगळे प्रसंग असतात. एकदा ‘आश्रमातील सेवा कशा लक्षात ठेवायच्या ? एखादे सूत्र दुर्लक्षित झाले, तर काय करायचे ?’, याविषयी आम्ही साधक चर्चा करत होतो. तेव्हा त्याने सेवेतील कुठलेही सूत्र सुटू नये, यासाठी सेवांच्या नोंदींची वही बनवल्याचे सांगितले. त्या वहीत ‘सेवेचे स्वरूप, निरोप कधी मिळाला आणि त्या सेवेची अद्ययावत माहिती काय आहे ?’ , अशी सर्व पडताळणीची सूत्रे होती. ती इतकी व्यवस्थित होती की, कोणतीही नवीन सेवा आली, तर ‘तिचा बारकाईने अभ्यास कसा करायचा ?’, हे आम्हाला त्यावरून शिकायला मिळाले.

७. कुशाग्र बुद्धीमत्ता

मी रामनाथी आश्रमात न्यायालयीन सेवेसाठी गेल्यानंतर मला निनाददादाचे आणखी काही गुण लक्षात आले. त्यामुळे निनाददादाचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व माझ्या लक्षात आले. कायदेविषयक सेवा असो किंवा अधिकोषातील व्यवहार, तो कोणतीही सेवा करण्यास तत्पर असतो. पुष्कळ वेळा माझा त्याच्याशी कायदेविषयक सेवांसाठी संपर्क येतो. तेव्हा ‘त्याला कोणताही घटनाक्रम व्यवस्थित लक्षात असतो’, असे माझ्या लक्षात आले.

८. स्वतःच्या चुकांविषयी संवेदनशील

त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्याविषयी त्याला दायित्व असणार्‍या साधकांनी जाणीव करून दिली होती. तेव्हा त्या कालावधीत झालेली सर्व प्रक्रिया त्याने अतिशय सकारात्मक घेतली आणि त्यावर गांभीर्याने प्रयत्न केले. ‘त्यामुळेच त्याची लवकर आध्यात्मिक प्रगती झाली’, असे मला जाणवले.

९. गुरूंवरील श्रद्धा 

९ अ. ‘ग्रामसदस्य’ म्हणून निवडून आल्यावर श्री. निनादमध्ये अहं न जाणवणे आणि त्याने आश्रमातील सेवा अन् बाहेरील सेवा यांकडे ईश्वरेच्छेने पाहून अत्यंत कुशलतेने सर्व सेवा सांभाळणे : निनाददादा ग्रामपंचायत निवडणुकीत देवद गावातून ‘ग्रामसदस्य’ म्हणून निवडून आला होता. तेव्हा गावातील लोकांनी त्याची मिरवणूकही काढली होती. त्या वेळी त्याने त्या कालावधीतील सर्व सेवांकडे ईश्वरेच्छा म्हणून पाहिले. त्याच्या बोलण्यातून किंवा कृतीतून ‘त्याला त्याचा अहं आहे’, असे कधीच जाणवले नाही. त्याने त्याचे श्रेय नेहमीच श्रीगुरुचरणी अर्पण केले. त्याने तेव्हा आश्रमातील सेवा आणि बाहेरील सेवा अत्यंत कुशलतेने सांभाळल्या. केवळ आश्रमातील साधकांनाच नाही, तर गावातील लोकांनाही त्याचा आधार वाटायचा. तो सर्वांचेच प्रश्न आनंदाने सोडवायचा.

९ आ. प्रत्येक प्रसंग स्वीकारून साधना म्हणून करणे : त्याच्याकडे पुष्कळ सेवा असतात. रुग्णाईत वडिलांची सेवाही त्याने न कंटाळता केली. आतापर्यंत तो कधीच ‘मला हे सर्व जमणार नाही’, असे म्हणाला नाही. ‘समोर आलेला प्रत्येक प्रसंग स्वीकारून त्यातून साधना करणे’, एवढाच त्याचा विचार असतो.’

– अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर (पूर्वाश्रमीच्या अधिवक्त्या (कु.) अदिती पवार), पाळे-शिरदोन, गोवा.