रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करून आश्रमातील चैतन्याचा लाभ करवून घेऊन स्वतःमध्ये अंतर्बाह्य पालट करून घेणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

कु. अपाला औंधकर

माझी मुलगी कु. अपाला दीड वर्षापासून तिच्या आजोबांकडे राहून (श्री. अशोक रेणके, फोंडा येथे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन-जाऊन साधना करत आहे. अपाला आश्रमात सेवेसाठी जायची, त्या वेळी आरंभी तिच्यात धांदरटपणा, चंचलपणा, उतावळेपणा, मनाप्रमाणे वागणे, असे अनेक स्वभावदोष आणि अहंचे पैलू दिसून येत होते. तिचे दायित्व असणार्‍या साधकांनी तिला अनेक वेळा त्याची जाणीव करून दिली. तेव्हा अपालाने सर्व गोष्टी सकारात्मक राहून शिकण्याचा प्रयत्न केला. अपाला आश्रमातून पहिल्यांदा काही दिवसांसाठी घरी आली, त्या वेळी मला तिच्यात काही पालट जाणवला नव्हता. ती दुसर्‍यांदा घरी आली, त्या वेळी मला तिच्यात पालट जाणवू लागला आणि ती तिसर्‍यांदा घरी आली, त्या वेळी मला तिच्यात पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला. अपाला ६ मासांच्या अंतराने घरी येत होती. त्या वेळी मला टप्प्याटप्प्याने तिच्यात झालेला पालट अनुभवता आला. ते पालट पुढे दिले आहेत.

सौ. दीपा औंधकर

१. स्वभावदोष न्यून होणे

१ अ. अपालातील धांदरटपणा आणि उतावळेपणा हे स्वभावदोष न्यून झाले आहेत.

२. गुणसंवर्धन होणे

२ अ. स्वयंशिस्त आणि व्यवस्थितपणा

१. अपालाला स्वयंशिस्त लागत असल्याचे लक्षात आले. ती स्वतःचे कपडे स्वतः धुत होती.

२. ती तिच्या कपड्यांना इस्त्री करू लागली आणि ती तिचा खण नीटनेटका ठेवू लागली.

२ आ. सवलत न घेणे : अपाला घरी आल्यावरही पंजाबी पोशाख घालते. ती घरातही आश्रमात असल्याप्रमाणेच वागते. ती घरी आल्यावर कोणतीही सवलत घेत नाही.

२ इ. भाषाशुद्धी होणे : अपालाने आश्रमात जाऊन थोडा वेळ सेवा केल्यामुळे तिची भाषाशुद्धी झाली. तिचे मराठी व्याकरण चांगले झाले. तिला पूर्वी हिंदी बोलता येत नव्हते. आता तिला हिंदीतून बोलण्याचा चांगल्या प्रकारे सराव होत आहे. ती इंग्रजीतून बोलतांना तिचा उच्चारांचा अभ्यास होतो.

२ ई. तिचे आश्रमातील अनेक साधकांशी नातेसंबंध जुळले. त्यामुळे तिच्यामध्ये नम्रता, आदरभाव आणि प्रेमभाव या गुणांची वृद्धी झाली.

२ उ. विचारण्याची वृत्ती या गुणात वृद्धी होणे : तिला प्रत्येक गोष्ट विचारून करण्याची सवय लागली. ती घरी आल्यावर तिच्या वस्तूही तिने विचारून वापरल्या. घरातील तिची एक वस्तू तिला आश्रमात न्यायची होती. तिने मला विचारूनच ती वस्तू घेतली.

२ ऊ. अपालामध्ये स्थिरता आली. तिने प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे आणि करणे चालू केले.

२ ए. तिच्यामध्ये नेतृत्वगुण आणि संघभाव वाढला. त्यामुळे तिला दायित्व घेऊन सेवा करतांना आनंद मिळतो.

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेणे

अ. तिला लिखाणाची सवय लागली. तिला चिंतन करता येऊ लागले. त्यामुळे ती शिकण्याच्या स्थितीत रहाते.

आ. एकदा माझ्याकडून एक गंभीर चूक झाली होती. त्या वेळी मला चुकीच्या मुळापर्यंत जाता येत नव्हते. मला त्याचा पुष्कळ ताण आला होता. त्या वेळी अपालाने मला स्वभावदोषाच्या मुळापर्यंत कसे जायचे ?, हे अगदी सोप्या पद्धतीने शिकवले. तुला कसे जमले ?, असे तिला विचारल्यावर ती मला म्हणाली, आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यामुळे जमले.

४. देवाप्रतीच्या भावात वृद्धी होणे

४ अ. प्रत्येक गोष्ट ईश्‍वरेच्छेने होते, अशी दृढ श्रद्धा निर्माण होणे : प्रत्येक गोष्ट ईश्‍वरेच्छेने होते, हे अपालाच्या मनावर बिंबले आहे. एकदा रात्री गाढ झोपेत असतांना ती ईश्‍वरेच्छा, असे म्हणाली. तिच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही, तर ती लगेच ईश्‍वरेच्छा असे म्हणते. ती घरी आली असतांना आम्ही उपाहारगृहात गेलो होतो. तिथे तिने उत्साहाने तिच्या आवडीचा पदार्थ मागवला; पण त्या पदार्थाला काहीच चव नव्हती. तिने लगेच ईश्‍वरेच्छा, असे म्हणून स्वीकारले.

४ आ. देवाच्या अनुसंधानात रहाणे : आश्रमात सेवा करत असतांना तेथील सात्त्विकतेमुळे तिला क्षणोक्षणी देवाच्या अनुसंधानात रहाणे जमू लागले आहे. ती परात्पर गुरुदेवांना  सूक्ष्मातून विचारून निर्णय घेते. त्यामुळे तिच्यातील निर्णयक्षमता वाढली आहे, असे मला वाटते.

५. आश्रमजीवनाचे महत्त्व लक्षात येणे

अपालाच्या उदाहरणातून आश्रमात सेवा केल्यामुळे स्वतःत अंतर्बाह्य पालट होतो, हे मी अनुभवले. आश्रमात सेवा केल्यामुळेच हे शक्य होऊ शकते. आई-वडील या नात्याने पालक मुलांवर जे संस्कार करू शकत नाहीत, ते संस्कार मुलांवर आश्रमात सेवा केल्याने आपोआप होतात. प्रत्येक साधकाने त्यांच्या पाल्याला आश्रमात थोडा काळ रहायला पाठवावे, असे मला वाटते.

हे गुरुदेवा, तुम्हीच अपालाला आश्रमातील संत आणि साधक यांच्या माध्यमातून घडवत आहात. आज अपाला जी काही आहे, ही केवळ तुमची कृपा आहे. अपालात अंतर्बाह्य पालट झाल्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– सौ. दीपा औंधकर (अपालाची आई), रत्नागिरी (२८.४.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक