‘आपल्या शरिराला आधार देणारे, धरून ठेवणारे आणि पोषण करणारे घटक, म्हणजे धातू होय. आपल्या शरिरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र असे ७ प्रकारचे धातू असतात. या सर्व धातूंचा सार ‘ओज’ असतो. या ओजावर आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) अवलंबून असते. आपल्या शरिरातील धातूंचे संतुलन बिघडल्यास विविध लक्षणे दिसून येतात.
हे धातू वर सांगितले, त्याच क्रमाने आपल्या शरिरात निर्माण होतात. सर्वप्रथम रस हा धातू निर्माण होतो. त्यापासून रक्त निर्माण होते आणि रक्तापासून मांस बनते. अशा पद्धतीने उतरोत्तर धातू निर्माण होतात. आपण दुधाचे विरजण लावल्यावर दही बनते, दही घुसळल्यावर ताक बनते, ताकापासून लोणी आणि लोण्याचे शेवटी तूप बनते. त्याप्रमाणे आहारापासून प्रथम रस धातू निर्माण होतो. त्यानंतर रक्त धातू बनतो. अशा पद्धतीने पुढील धातू निर्माण होतात. प्रत्येक धातूचे अग्नीच्या माध्यमातून पचन होऊन पुढचा धातू निर्माण होतो. तसेच त्यापासून विविध मलही निर्माण होतात. आपण जेवढ्या चांगल्या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपला आहार चांगला असल्यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.
१. रस धातू
आपण आहार घेतल्यानंतर त्याचे पचन होऊन त्यापासून आहार रस निर्माण होतो. त्यात प्रत्येक अवयवाला पोषण करण्यासाठी पोषक अंश असतात. त्या रसापासून निर्माण होणारा पहिला धातू म्हणजे रस.
अ. रस धातूचे कार्य : हा धातू आपल्या शरिराला तरतरी (उत्साह) आणतो. याच रसाचे पचन होऊन पुढे रक्त धातूची निर्मिती होते. त्यातून मल स्वरूपात कफ निर्माण होतो. आपल्या शरिरात रस धातू अल्प अधिक झाल्यास तशी लक्षणे दिसून येतात.
आ. रस धातू दुर्बल झाल्यास दिसणारी लक्षणे :
१. भूक न लागणे
२. तोंडाला चव नसणे
३. मळमळ होणे
४. डोळ्यांवर झापड येणे
५. वारंवार अंगात ताप असल्यासारखे वाटणे
इ. रस धातूच्या दुर्बलतेवर चिकित्सा : रस धातू उत्तम बनण्यासाठी आपण शतावरी, गुळवेल, फळांचे रस, खजुराचे पाणी (खरजुरादी मंथ), लाह्यांचे पाणी (लाजा मंड) असे औषध स्वरूपात घ्यायला पाहिजे. ही औषधे ‘टॉनिक’सारखी कार्य करतात. रस धातू वाढल्यास अपचनासारखी लक्षणे दिसतात. त्यावर लंघन (उपवास करणे), कडू चवीच्या औषधांचा वापर केला जातो.
ई. रस धातू अल्प झाल्यास दिसणारी लक्षणे : रस धातू अल्प झाल्यास रुक्षता येणे, ग्लानी येणे, तोंडाला कोरड पडणे आदी लक्षणे दिसतात. थोडक्यात ‘डिहायड्रेशन’सारखी लक्षणे दिसतात. तेव्हा आपण सरबत, ऊसाचा रस, फळांचे रस असे उपचार करू शकतो.
२. रक्त धातू
रक्त धातूलाच आपण जीवन म्हणतो; कारण रक्तामुळेच आपण जिवंत असतो आणि हेच रक्ताचे मुख्य कार्य आहे. त्वचेला प्राकृत वर्ण देणे हेही रक्ताचे कर्म आहे. जेव्हा रक्ताला विकृत वर्ण येतो, तेव्हा तो लगेच त्वचेवर दिसून येतो. रक्त धातूचे पचन होऊन पुढे मांस धातू निर्माण होतो आणि मल स्वरूपात पित्त निर्माण होते. त्यामुळे रक्त आणि पित्त यांचा पुष्कळ जवळचा संबंध आहे. त्यांचे गुणही बरेचसे सारखे असतात.
अ. रक्त धातू अल्प झाल्यास दिसणारी लक्षणे :
१. आंबट आणि थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणे
२. थंड वातावरण हवेहवेसे वाटणे
आ. रक्त धातू वाढण्यासाठी करावयाची चिकित्सा : रक्त धातूच्या वाढीसाठी नाचणीचे सत्त्व, डाळी, खजूर, अंजीर असे पदार्थ आहारात घ्यावे.
३. मांस धातू
या धातूचे मुख्य कार्य शरिराला लेपन करणे आहे. आपण भिंतीला रंग देतो, तेव्हा भिंतीच्या खाचा आणि असमतोलपणा अल्प करण्यासाठी त्यात लांबी भरतो. तसेच त्याला एकसारखे करून मग रंग देतो. त्याचप्रमाणे शरिरातील उंच खोलगटपणावर मांसाचे लेपन होऊन त्याला योग्य असा आकार मिळतो. हा धातू नसता, तर आपण सर्व हाडांचे सांगाडेच असतो. आपल्यामध्ये हा धातू जेवढा चांगला असतो, तेवढे अधिक बळ असते. याचे पचन झाल्यावर कान आणि नाकपुड्या यांमध्ये मल, तर डोळ्यांमध्ये चीपड (एक प्रकारची घाण) निर्माण होतो.
अ. मांस धातू अल्प झाल्यावर दिसणारी लक्षणे :
१. दुर्बलता येणे
२. सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे
३. शरिराची शक्ती अल्प होणे
आ. मांस धातूच्या दुर्बलतेवर चिकित्सा : मांस धातू वाढवण्यासाठी चिकित्सा म्हणून बला तेल, नारायण तेल आणि महामाश तेल यांनी अभ्यंग (मालिश) सांगितले जाते. पोटातून अश्वगंधारिष्ट, शतावरी घृत, बलारिष्ट अशी औषधे दिली जातात.
४. मेद धातू
हा धातू शरिराच्या सर्व अवयवांना स्निग्धता आणि शरिराला वंगण देतो. त्वचेखाली असलेल्या मेदाच्या आच्छादनामुळे थंड किंवा उष्ण अशा वातावरणापासून आपले रक्षण होते. मेदाचे पचन झाल्यानंतर घाम हा मल स्वरूपात बाहेर पडतो. पुष्कळ लठ्ठ असणार्या व्यक्तींना अधिक घाम येण्याचे कारण आपल्या लक्षात आले असेलच. जेवढा मेद अधिक तेवढा घामही अधिक, हे समीकरण आहे.
अ. मेद धातू दुर्बल झाल्यास दिसणारी लक्षणे :
१. वजन अल्प होणे
२. खाज येणे
३. अधिक घाम येणे
आ. मेद धातूच्या दुर्बलतेवर चिकित्सा : मेद धातू दुर्बल असणार्या रुग्णांनी म्हशीचे दूध आणि तूप आहारात घेणे चांगले असते. तसेच तेलाने मालिश करणेही लाभदायी ठरते.
५. अस्थी धातू
आपल्या शरिराला आधार देणारा आणि आपल्याला उभे रहाण्यासाठी साहाय्य करणारा सर्वांत बळकट धातू, म्हणजे हाडे. आपल्या शरिरावरील केस, लव आणि नखे हा याचा मल आहे.
अ. अस्थी धातूचा क्षय झाल्यावर दिसणारी लक्षणे :
१. हाडे दुखणे
२. वारंवार सांधे दुखणे
३. हाडे पोकळ होणे
४. दातांचे तुकडे पडणे
५. नखांना चिरा पडणे
६. केस पुष्कळ गळणे
आ. अस्थी धातूच्या दुर्बलतेवर चिकित्सा : आहारात दूध, नाचणीची खीर, गहू, उडीद आणि खारीक हे पदार्थ घ्यावे. तसेच नारायण तेल, लाक्षादी तेल, चंदनबलालाक्षादी तेल, धन्वंतर तेल यांनी मालिश करावी. औषधांमध्ये लाक्षा गुग्गुळ, आभादी गुग्गुळ यांचा वापर करता येतो. याखेरीज कडू औषधांनी सिद्ध बस्तीही देतात.
६. मज्जा धातू
अस्थींच्या आत असलेल्या पोकळीत हा मज्जा धातू असतो. हाडांची पोकळी भरून काढण्याचे काम हा धातू करत असतो. आपल्या मस्तिष्कमध्येही हाडे आहेत. त्यातील मज्जा धातूमुळे आपल्या मानसिक भावांचे नियंत्रण आणि मनाचे कार्य चांगल्या पद्धतीने घडत असते.
अ. मज्जा धातू अल्प झाल्यावर दिसणारी लक्षणे :
१. हाडे पोकळ होणे
२. सांधे दुखणे
३. इंद्रियांचे नियंत्रण अल्प होणे
४. चक्कर येणे
५. डोळ्यांपुढे अंधारी येणे
आ. मज्जा धातू वाढवण्यासाठी चिकित्सा : मज्जा धातूच्या दुर्बलतेसाठी दूध, तूप आणि बदाम अशा पदार्थांचे सेवन करणे उपयोगी ठरते. तसेच शंखपुष्पीसारखी औषधे मज्जा धातूवर चांगले कार्य करतात.
७. शुक्र धातू
या धातूमध्ये नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता असते. नवीन जीव निर्माण करण्यासह शरिरामध्ये नव्याने पेशीही निर्माण होत असतात. हे कार्यही या धातूमुळे घडून येते.
अ. शुक्र धातू दुर्बल असल्याची लक्षणे :
१. संतती न होणे
२. वारंवार गर्भपात होणे
३. रोगप्रतिकारक्षमता अल्प होणे
आ. शुक्र धातूच्या दुर्बलतेवर चिकित्सा : शुक्र धातूच्या दुर्बलतेवर च्यवनप्राश, मधुमालिनीवसंत, अश्वगंधा अशी औषधे लाभदायी ठरतात. तसेच आहारात दूध आणि तूप यांचा यथायोग्य समावेश करायला हवा.
अशा पद्धतीने आपण दोष आणि धातू यांची माहिती करून घेतली. हे सर्व घटक एका चमूसारखे ‘म्युच्युअल अंडरस्टॅडिंग’सारखे (एकमेकांच्या सामंजस्याने) कार्य करत असतात. दोष चांगले असतील, तर धातू आणि मल चांगले असतात. दोष बिघडल्यास धातूही बिघडतात. त्यामुळे आयुर्वेदात धातूंनाही विशेष महत्त्व आहे. या लेखात सांगितलेली औषधे आणि उपचार मनाने न घेता आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे
(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’, यू ट्यूब वाहिनी)