‘दशदिक्‍पाल पूजना’च्‍या वेळी अकस्‍मात् आलेला जोरदार पाऊस आणि वारे यांमुळे गडबडून न जाता गुरुकृपेने उत्‍स्‍फूर्तपणे, संघटितपणे आणि सतर्कतेने पटपट कृती करणारे देवद आश्रमातील साधक !

पूजनाच्‍या वेळी करण्‍यात आलेली देवतांची मांडणी

‘१६.३.२०२३ या दिवशी देवद येथील सनातनच्‍या आश्रमात ‘दशदिक्‍पाल पूजन’ आणि १७.३.२०२३ या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग झाला. १६.३.२०२३ या दिवशी ‘दशदिक्‍पाल पूजन’ चालू होण्‍याच्‍या वेळी अकस्‍मात् मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा चालू झाला. तेव्‍हा गुरुमाऊलींच्‍या कृपेने साधकांनी गडबडून न जाता उत्‍स्‍फूर्तपणे, संघटितपणे, सतर्कतेने  आणि विचारून घेऊन सर्व कृती पटपट केल्‍या. तेव्‍हा मला देवद आश्रमातील साधकांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

१. ‘दशदिक्‍पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग यांसाठी देवद आश्रमाच्‍या आवारातील मोकळ्‍या जागेत मंडप घालून केलेली सिद्धता !

देवद आश्रमाच्‍या आवारातील मोकळ्‍या जागेत ‘दशदिक्‍पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग यांसाठी मंडप घातला होता. मंडपाच्‍या अर्ध्‍या भागात पूजन आणि याग करण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्व सिद्धता केली होती. उर्वरित अर्ध्‍या भागात साधकांना बसण्‍यासाठी १०० हून अधिक आसंद्यांची मांडणी केली होती.

२. ‘दशदिक्‍पाल पूजना’च्‍या वेळी अकस्‍मात् पाऊस चालू झाल्‍यावर साधकांनी सतर्कतेने आणि संघटितपणे केलेल्‍या सेवा !

‘दशदिक्‍पाल पूजन’ चालू होण्‍याच्‍या वेळी अकस्‍मात् जोराचा वारा आणि पाऊस चालू झाला. त्‍यामुळे मंडपामधील आसंद्या अन् इतर सर्व साहित्‍य आश्रमाच्‍या आत आणावे लागले. अकस्‍मात् आलेल्‍या पावसामुळे आश्रमामध्‍ये एकप्रकारे आपत्‍कालीन स्‍थितीच निर्माण झाली. या वेळी आश्रमामध्‍ये साधारण २०० हून अधिक साधक होते. पावसाचा जोर आणि तीव्रता पहाता बसून नियोजन करण्‍यासाठी वेळच नव्‍हता. समोर आलेल्‍या संकटाला सामोरे जाऊन ‘वस्‍तूंची हानी कशी टाळता येईल ?’, असा विचार करून सर्व साधकांनी कृती करायला आरंभ केला.

२ अ. साधकांनी स्‍वयंस्‍फूर्तीने आणि संघटितपणे केलेल्‍या सेवा !

१. एकाच वेळी अनेक सेवा कराव्‍या लागत होत्‍या, उदा. भोजनकक्षातील महाप्रसादाशी संबंधित साहित्‍य अन्‍य ठिकाणी हालवणे, केर काढणे, बाहेरील आसंद्या भोजनकक्षात आणणे, त्‍या पुसणे, सर्वांचे पाय ओले असल्‍याने शेवटी भोजनकक्षातील लादी पुसणे इत्‍यादी.

२. तरुण साधक जड साहित्‍य उचलण्‍याची सेवा करत होते, तर वयस्‍कर आणि शारीरिकदृष्‍ट्या अल्‍प क्षमता असलेले साधक त्‍यांना साहाय्‍य करत होते.

३. प्रत्‍येक साधक ‘कुठलेे साहित्‍य कुठे ठेवायला हवे ?’, याचा योग्‍य पद्धतीने विचार करून त्‍यानुसार कृती करत होता. ‘देव साधकांना आतून योग्‍य ते सुचवत होता’, हे प्रकर्षाने जाणवले. त्‍याचप्रमाणे साधक विचारूनही कृती करत होते.

४. काही साधकांना महाप्रसाद अर्धवट सोडून साहाय्‍यासाठी जावे लागले. तेव्‍हा त्‍यांचे ताट झाकून ठेवणे किंवा ज्‍यांचा महाप्रसाद घेऊन झाला होता, त्‍यांचे ताट धुणे, या सेवा वयस्‍कर साधकांनी स्‍वतःहून केल्‍या.

२ आ. या सेवा करतांना अनुभवलेली गुरुकृपा !

१. एरव्‍ही ज्‍या सेवा करायला साधकांना घंटोन्‌घंटे लागतात, त्‍या सेवा सर्व साधकांनी संघटितपणे केल्‍यामुळे काही मिनिटांमध्‍येच पूर्ण झाल्‍या.

२. शेवटी सर्व साहित्‍य व्‍यवस्‍थित सापडले. ‘काही हरवले आहे किंवा सापडले नाही’, असे झाले नाही.

३. अकस्‍मात् आलेल्‍या पावसामुळे झटपट निर्णय घेऊन सेवा कराव्‍या लागल्‍या; मात्र कुणाही साधकाच्‍या मनात नकारात्‍मक विचार आले नाहीत. सर्व साधक सकारात्‍मक आणि भावाच्‍या स्‍थितीत होते.

४. ही सेवा करतांना काही साधकांना त्‍यांच्‍या ‘शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले काळ्‍या (त्रासदायक) शक्‍तींचे आवरण न्‍यून झाले’, अशी अनुभूती आली. तेव्‍हा त्‍यांना वाटले, ‘कदाचित् पूजन पहायला बसल्‍यावरही एवढ्या जलदगतीने आवरण न्‍यून झाले नसते.’

५. साधकांना पूजन पाहिल्‍यानंतर मिळणारा आनंद गुुरुमाऊलींच्‍या कृपेने या सर्व सेवा करतांना अनुभवता आला.

या प्रसंगात मला साधकांमधील संघटितपणा, निर्भयता, ताण न घेणे, वर्तमान स्‍थितीत राहून ‘दिसेल ते कर्तव्‍य’ या भावाने सेवा करणे, निरपेक्षता, समर्पण, तळमळ, भाव, श्रद्धा इत्‍यादी दैवी गुणांचे दर्शन झाले.

३. गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना !

अकस्‍मात् निर्माण झालेल्‍या आपत्‍कालीन परिस्‍थितीला साधक संघटितपणे आणि अत्‍यंत धिराने सामोरे गेल्‍यामुळे सर्वांनाच गुरुमाऊलींविषयी कृतज्ञता वाटत होती. गुरुमाऊलींच्‍या शिकवणीमुळे साधक चांगल्‍या पद्धतीने घडले आहेत ! साधकांना ताण आला किंवा ते हतबल झाले, असे काहीही घडले नाही. यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. ‘गुरुमाऊली, आम्‍हा सर्व साधकांना तुम्‍हाला अपेक्षित असे घडवा’, अशी आपल्‍या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१७ .३.२०२३)

वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्र

‘दशदिक्‍पाल पूजना’च्‍या वेळी अकस्‍मात् पाऊस आणि वारा चालू झाल्‍यावर ‘वरुणदेवता पावसाच्‍या रूपात अन् वायूदेवता वार्‍याच्‍या माध्‍यमातून आशीर्वाद देत आहे’, असे जाणवत होते.’- वैद्या सुश्री (कु.) माया पाटील

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक