१ लाख रुपयांवरील थकीत पाणीदेयकाच्या रकमेवरील विलंब शुल्कात २५ टक्के सवलत !


नवी मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – १ लाख रुपयांवरील रकमेच्या थकीत पाणीदेयकाच्या रकमेवरील विलंब शुल्कावर २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीदेयकाची १ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची थकबाकी असणार्‍या ग्राहकांना लोक अदालतीमध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

यामध्ये ५०४  ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या ग्राहकांकडून सुमारे ३९ कोटी रुपये थकबाकी मिळणे अपेक्षित होते; मात्र यांनी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने केवळ ३० लाख ५५ सहस्र रुपये वसूल झाले. या वेळी ‘संबंधित ग्राहकांनी लोक अदालतीमध्ये दंडात्मक रकमेवर काही सूट मिळावी’, अशी मागणी केली होती. न्याय प्राधिकरणाने याविषयी निर्णय घेण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्यानुसार आयुक्त नार्वेकर यांनी वरील निर्णय घेत या थकबाकीदारांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.