१. सेवेला वेळ देऊ लागल्यावर घरातील अडचणी वाढणे आणि गुरुदेवांनी शक्ती दिल्यामुळे सेवा करता येणे
‘वर्ष २००१ पासून माझ्या साधनेला आरंभ झाला. मला सेवेतही आनंद मिळू लागला. माझी दोन्ही मुले शाळेत गेल्यावर सर्वकाही गुरुदेवांवर सोपवून मी सेवेला जात होते. असे मी ५ – ६ वर्षे केले. तेव्हा मी शिवणकाम करत होते. मी तेही रात्री करायला लागले. मी दिवसा सत्संग आणि सेवा करण्यासाठी जात होते. त्यानंतर सेवेला वेळ मिळावा; म्हणून मी शिवणकाम बंद केले. देवाने मला पुष्कळ सेवा दिल्या. मी सेवेला वेळ देऊ लागल्यावर घरातील अडचणी वाढल्या. गुरुदेवांनी मला पुष्कळ शक्ती दिली. त्यामुळे त्याही स्थितीत मी सेवा करत राहिले.
२. रामनाथी आश्रमात गेल्यावर गुरुदेवांना साधना आणि घर यांतील अडचणी सांगणे, त्यांनी ‘देव ऐकत आहे ना ! देव बघत आहे’, असे सांगतल्यावर मन शांत होणे
पूर्वी एकदा मला गुरुदेवांच्या कृपेने रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली होती. तेथे मला गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्या वेळी मी गुरुदेवांना साधना आणि घर यांतील अडचणी सांगितल्या. तेव्हा गुरुदेवांनी सांगितले, ‘‘देव ऐकत आहे ना ! देव बघत आहे.’’ हे वाक्य मी माझ्या हृदयात कायम कोरून ठेवले. गुरुदेवांचे हे वाक्य आठवल्यावर माझे मन शांत होते. त्या वेळी ‘तेच काळजी घेणार आहेत’, असा भाव माझ्या मनात असतो. गुरुदेवांच्या या एका वाक्याने मला आजपर्यंत साधना आणि सेवा यांत ठेवले आहे.
‘गुरुदेवांमुळे मी सेवा आणि साधना करत आहे’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहे.’
– सौ. सुवर्णा रागमहाले (वय ५२ वर्षे), तळेगाव, पुणे. (२०.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |