२०.३.२०२३ (फाल्गुन कृष्ण चतुर्दशी) या दिवशी तळेगाव दाभाडे (पुणे) येथील सौ. सुवर्णा रागमहाले यांचा ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लहान बहीण श्रीमती संध्या बधाले यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. सुवर्णा रागमहाले यांना ५२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. लहान बहिणीला साधनेचे महत्त्व सांगून तिच्याकडून साधना करून घेणे
‘माझी मोठी बहीण सौ. सुवर्णा रागमहाले हिला आम्ही सर्व जण ‘आक्का’ म्हणतो. आक्का पूर्वीपासूनच ‘सनातन संस्थे’नुसार साधना करत होती. मला साधनेचे महत्त्व सांगून ती माझ्याकडून त्याप्रमाणे कृती करून घेत होती. तिच्यामुळे मी साधनेत आले. मला साधनेचे महत्त्व समजल्यानंतर माझी मुलेही साधना करू लागली. आरंभी तिने आम्हाला गुरुपौर्णिमेसाठी तळेगाव येथे बोलावले. त्यानंतर तिने मला सनातनची सर्व सात्त्विक उत्पादने वापरायला सांगितली, तसेच ग्रंथांचे महत्त्व सांगून तेही घ्यायला सांगितले. त्यानंतर ‘नामजप केल्याने काय लाभ होतो आणि सत्संगाचे महत्त्व काय ?’, याविषयीही तिने आम्हाला माहिती सांगितली. साधनेचे महत्त्व समजायला लागल्यावर ती मला हळूहळू सेवेला बोलावू लागली. ‘सेवा केल्यावर काय लाभ होतो ?’, हेही ती मला सांगायची. माझ्या जीवनात काही कठीण प्रसंग आले. तेव्हा तिने ‘सनातन संस्थे’ने प्रकाशित केलेले काही ग्रंथ मला वाचायला दिले. त्यानंतर मी साधना करायला लागले.
२. प्रेमभाव
नंतर मी आणि माझी ३ मुले रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करायला लागलो. आश्रमात आल्यावर माझा तिच्याशी संपर्क न्यून झाला असला, तरी भ्रमणभाषवर कधीतरी तिच्याशी बोलणे झाल्यावर तिचे प्रेम पूर्वीप्रमाणेच जाणवायचे. माझ्या आईचे निधन लवकर झाले. आक्काने मला, तसेच माझी मधली बहीण सौ. विद्या रिठे आणि लहान भाऊ श्री. तुषार वाळुंज यांना आईप्रमाणे प्रेम देऊन आमची काळजी घेतली.
३. तिच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरी ती त्या सर्व प्रसंगांना न डगमगता स्थिर राहून सामोरे गेली.
४. आम्ही कधी तिच्या घरी गेलो, तर ‘हे रामनाथी आश्रमातील साधक आहेत’, असा तिचा भाव असतो.
५. माझा मुलगा अतुल याच्या लग्नासाठी रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाल्यामुळे तिला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. लग्नाच्या वेळी ती पुढाकार घेऊन ‘काय हवे-नको’, ते पहात होती.
६. इतरांना साहाय्य करणे
आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहोत. अतुलचे लग्न झाल्यावर देवदर्शन आणि कुलाचार यांसाठी आम्ही पुण्याला जाणार होतो. पुण्याला गेल्यावर ‘आम्ही ५ जण कुठे रहाणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. त्यानंतर याविषयी आक्काशी बोलल्यावर ती मला म्हणाली, ‘‘माझे घर आहे. तुम्ही कितीही दिवस येथे राहू शकता.’’ तेव्हा मला तिच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘गुरुमाऊली आपल्याला कशाचीच उणीव भासू देत नाही’, याची मला जाणीव झाली. लग्नानंतरचा कुलाचार तिनेच पुढाकार घेऊन केला. ‘अतुलची पत्नी, म्हणजे स्वतःचीच सून आहे’, या विचाराने तिने सर्वकाही आनंदाने केले.
‘देवाने मला साधना करणारी आणि साधनेत मलाही पुढे घेऊन जाणारी बहीण दिली’, यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती संध्या बधाले (सौ. सुवर्णा रागमहाले यांची लहान बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२३)