अस्वच्छ प्रसाधनगृह, अपुरी आसनक्षमता आणि मूलभूत सुविधांची वानवा असलेले देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

७५ वर्षे पूर्ण झालेल्या एस्.टी.चे २०२३ हे ‘अमृत महोत्सवी’ वर्ष आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यानिमित्ताने ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेतली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याविषयी सूचना दिल्या आहेत. एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी डिसेंबर २०२२ मध्ये आगारप्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेचा कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. मोहीम चालू होऊन ३ मास झाले आहेत. राज्यातील विविध बसस्थानके स्वच्छ केल्याची अनेक छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारितही करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विविध जिल्ह्यांतील बसस्थानकांवर प्रत्यक्ष जाऊन तेथील स्थिती जाणून घेतली. काही ठिकाणी तेथील प्रमुख, चालक-वाहक, प्रवासी यांच्याशी संवाद साधला. या वेळी मात्र एस्.टी. बसस्थानकांची विदारक स्थिती आढळून आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त का होईना, बसस्थानकांची स्वच्छता होईल, बसस्थानकावर प्रवाशांना किमान पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्यासाठी बाकडे, स्वच्छ प्रसाधनगृहे आदी मूलभूत सुविधा तरी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. ‘प्रवाशांदा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याविषयी उदासीन असणारे महामंडळ प्रवाशांना आकृष्ट करण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करणार ?’ हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार एस्.टी.ने खर्‍या अर्थाने सेवेत सुधारणा करावी. ब्रीदवाक्याप्रमाणे खरोखरच कारभार केल्यास एस्.टी.ला गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. ‘एस्.टी. आपली आहे. आर्थिक गर्तेत अडकलेल्या एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. याच भूमिकेतून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राज्यातील बसस्थानकांचा घेतलेल्या आढाव्याची वृत्तमालिका आम्ही प्रसिद्ध करत आहोत. शासकीय, प्रशासकीय, जनता आणि प्रामुख्याने एस्.टी. महामंडळ या सर्व स्तरांवर एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न व्हावेत, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.


देवगड, १९ मार्च (वार्ता.) – भिंतींच्या टाईल्सवर तंबाखूच्या पिचकार्‍या, धुळीचा थराने माखलेल्या टाईल्स,  लघवीच्या भांड्यांवर साचलेला पिवळा थर, अशी स्थिती आहे देवगड बसस्थानकावरील प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची ! कितीही दुर्गंधी असली, तरी नैसर्गिक विधीसाठी या स्वच्छतागृहांचा वापरकरण्याविना प्रवाशांपुढे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे प्रसाधनगृहात जाण्याची वेळ आलीच, तर नाक दाबून प्रवाशांना या प्रसाधनगृहाचा वापर करावा लागतो. अनेक दिवसांपासून अशी दुःस्थिती असलेल्या या प्रसाधनगृहाची किमान स्वच्छताही केली जात नाही.

देवगड बसस्थानकाच्या प्रसाधनगृहातील बेसिनच्या भांड्याचा नळ तुटला आहे. त्यामुळे बेसिनच्या बाजूला पाण्याचा पिंप ठेवण्यात आला आहे. बेसिनचीही स्वच्छता व्यवस्थित करण्यात येत नसल्यामुळे ते धुळीने माखले आहे. बेसिनच्या येथील टाईल्स तुटल्या आहेत. टाईल्स मातीने इतक्या माखल्या आहेत की, अनेक दिवस त्यांचीही व्यवस्थित स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसते. बसस्थानकावर लावण्यात आलेले एस्.टी. महामंडळाच्या योजनांची माहिती देणारे फलकही धुळीने माखले आहेत. भिंतीवरील विजेच्या तारा अस्ताव्यस्त लोंबत आहेत. बसस्थानकांच्या भिंतीवर विविध कार्यक्रम, विज्ञापने यांची भित्तीपत्रके लावण्यात येत असल्यामुळे त्याच्या कागदाचे कपटे भिंतींवर चिकटले आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे बसस्थानकांच्या भिंती विद्रूप झाल्या आहेत.

बसस्थानकातील भिंतींवर लोंबत असलेल्या विजेच्या तारा

प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे अपुरी !

बसस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बाकड्यांची सुविधा नाही. जागेअभावी अनेक प्रवाशांना बसची वाट पहात उभे रहावे लागते. बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम ठिकठिकाणी ढासळले आहे. त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे.

निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण !

बसस्थानकाच्या परिसराचे डांबरीकरण करण्यात आले आहे; मात्र नुकतेच काम केलेले असूनही डांबरीकरणातील खडी वर आली आहे. डांबरीकरणाचे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. ‘या कामात भ्रष्टाचार झाला आहे का ?’ याची चौकशी होणे आवश्यक आहे. निकृष्ट कामामुळे डांबरीकरण होऊनही बसस्थानकाच्या परिसरात पुष्कळ धूळ आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूला उगवलेले रानगवत वेळीच न काढल्यामुळे त्याची आता झुडपे निर्माण होत आहेत. एकूणच बसस्थानकांच्या परिसरात स्वच्छतेचा प्रचंड अभाव आहे.

अनेक मासांपासून उपाहारगृह बंद !

बसस्थानकाच्या आवारातील उपाहारगृह अनेक मासांपासून बंद आहे. त्यामुळे चहा पिण्यासाठीही प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेर जावे लागते. गाड्या वेळेत धावत नसल्यामुळे चहासाठी बाहेर गेल्यास गाडी निघून जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गाडी जाईल, या भीतीने प्रवासी बाहेर जाण्याचे टाळतात. या किमान सुविधा तरी बसस्थानकावर असायला हव्यात, याकडे महामंडळाने पहायला हवे.

अधिक माहितीसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने काही प्रवासी, विद्यार्थी, बस कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनाही या असुविधेमुळे मनस्ताप होत असल्याचे आढळले.

पावसाळ्यात बसगाड्यांमध्ये पाणी गळते ! – स्थानिक प्रवासी विद्यार्थी  

आगाराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गाड्या वेळेवर सुटत नाहीत. प्रसाधनगृह अस्वच्छ आहे. पावसाळ्यात बसगाड्यांमध्ये पाणी गळते. काही गाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत.

विश्रांतीगृहात असुविधा असून तेथे अस्वच्छ आणि असुरक्षित वाटते ! – कर्मचारी

विश्रांतीगृहात पुरेशा सुविधा नाहीत. ‘बसस्थानकामध्ये असुरक्षित वाटते’, असे एका कर्मचार्‍याने सांगितले. काही कर्मचार्‍यांनी अन्य बसस्थानकांच्या तुलनेत इथली व्यवस्था चांगली असल्याचे सांगितले.

स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे मजुरी देऊन स्वच्छता करावी लागते ! – नीलेश लाड, आगार व्यवस्थापक

देवगड बसस्थानकाच्या सामूहिक स्वच्छतागृहातील अस्वच्छता
देवगड बसस्थानकाच्या सामूहिक स्वच्छतागृहातील अस्वच्छता

आमच्याकडे स्वच्छता कर्मचारी नाहीत. त्यामुळे ३०० रुपये मजुरी देऊन काम करून घ्यावे लागते. सर्व कर्मचार्‍यांनी मिळून काही परिसर स्वच्छ केला आहे. उर्वरित स्वच्छता करणार आहोत. इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवलेला आहे, असे आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांनी सांगितले. हिरकणी कक्षाच्या दूरवस्थेविषयी विचारले असता ‘कक्षाचे काम त्वरित करून घेतो’, असे सांगितले.


अमृत महोत्सवी वर्षी एस्.टी.वर साडेतेरा सहस्र कोटी रुपये तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ !

एस्.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक !

मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२३ या अमृत महोत्सवी वर्षी १३ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या संचित तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ एस्.टी.वर आली आहे. एस्.टी. महामंडळाचा प्रतिमासाचा व्यय ७८० कोटी रुपये आहे. यामध्ये ३८० कोटी रुपये केवळ वेतनावर व्यय होत आहेत. प्रतिमासाचा इंधनाचा व्यय १२ कोटी रुपये इतका प्रचंड आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेले एस्.टी. महामंडळ चालू ठेवणे, हे केवळ राज्यशासनाच्या धोरणावर अवलंबून आहे.

वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारने एस्.टी.साठी १ सहस्र ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सरकारकडून निधी दिला जातो. सरकारकडून निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्मचार्‍यांचे वेतन रखडते. डिसेंबर २०२२ मध्ये राज्य सरकारला एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी २२३ कोटी रुपये द्यावे लागले. जानेवारी २०२३ मध्ये २२४ कोटी ७४ लाख, तर फेब्रुवारीमध्ये १०० कोटी रुपये द्यावे लागले. वेतनावर होणारा आणि अन्य व्यय लक्षात घेऊन या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एस्.टी. महामंडळासाठी अधिकची तरतूद करावी लागणार आहे. यासह एस्.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी ठोस उपाययोजना काढाव्या लागणार आहेत.