सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘विज्ञानात शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडलेले असतात; परंतु त्याला काही अपवादात्मक नियम असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातही असते. ‘साधकाने साधनेत स्वतःचा मनोलय होण्यासाठी ‘स्वेच्छेने’, म्हणजे स्वतःच्या मनानुसार न वागता ‘परेच्छेने’ आणि त्यानंतर ‘ईश्वरेच्छेने’ वागणे महत्त्वाचे असते’, असा सिद्धांत आहे. ‘यालाही अपवाद आहे’, या विषयीचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
एकदा अन्य राज्यातील एका जिल्ह्यात अध्यात्मप्रसाराची सेवा करणारी साधिका सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आली होती. ती परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाली, ‘‘मी प्रसारात सेवा करते; परंतु काही कारणास्तव माझी तेथे साधना होत नाही. या आश्रमात राहिल्यावर मला साधना व्यवस्थित करता येते. त्यामुळे मी प्रसारात न जाता आश्रमातच रहाते.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘चालेल.’’ त्यानंतर ती साधिका म्हणाली, ‘‘असा विचार करणे’, ही माझी ‘स्वेच्छा’च आहे ना ?’’ हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘ही स्वेच्छा असली, तरीही ती तुझ्या साधनेसाठी पूरक आहे. त्यामुळे ती योग्य आहे.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२३)