समाजातील लोक धर्माचरण करत नसल्याने साधकांना बसमधून प्रवास करतांना झालेले त्रास आणि त्यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अध्यात्मीकरणाचे महत्त्व !

श्री. संदीप शिंदे

१. बसने प्रवास करतांना ‘मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कुणीतरी श्वास कोंडून ठेवल्यासारखे वाटणे : ‘आम्ही (मी आणि यजमान श्री. संदीप शिंदे) ‘गोवा ते पुणे’ वातानुकूलित ‘स्लीपर’ बसने रात्रीचा प्रवास करत होतो. आम्ही वाहनदेवतेला प्रार्थना करून बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यापासूनच आम्हाला ‘मळमळणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कोणीतरी श्वास कोंडून ठेवल्यासारखे वाटणे आणि अपघाताची भीती वाटणे’, असे त्रास होऊ लागले.

२. बसमध्ये होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी नामजपादी उपाय करणे आणि झोपून प्रवास करणे शक्य नसल्याने वाहनचालकाच्या बाजूच्या जागेवर बसून प्रवास करणे : ‘प्रवासात होणारे हे त्रास नेहमीचे नसून आध्यात्मिक स्तरावरचे आहेत’, असे आम्हाला जाणवले; म्हणून आम्ही सर्वत्र सनातन कापूर पसरला. आम्ही स्वतःभोवती मानस मंडल घातले आणि भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवला. आम्ही सतत जयघोष आणि नामजपादी उपाय करत होतो. आम्हाला झोपणे शक्य नसल्यामुळे आम्ही वाहनचालकाच्या बाजूच्या जागेवर बसलो. तिथे बसल्यावर खिडकी उघडता आल्याने नैसर्गिक हवा मिळून आम्हाला होणार्‍या त्रासाची तीव्रता काही प्रमाणात न्यून झाली.

३. महिला प्रवाशांतील धर्माचरणाचा अभाव आणि त्यांचे अयोग्य वर्तन : प्रवाश्यांना रात्रीचे भोजन घेता येण्यासाठी बस एका ठिकाणी थांबली. तिथे अन्य पुष्कळ वाहने थांबली होती. बसमध्ये बसल्यावर त्रास होत असल्यामुळे आम्ही खाली उतरलो. तेव्हा महिलांची दुःस्थिती लक्षात आली. यातील पुष्कळ महिलांनी ‘जीन्स’, ‘टॉप’, ‘लेगिंग्ज’, छोटे कपडे, बाह्या नसलेले कपडे घातले होते. त्यांनी केस मोकळे सोडले होते. कुणीही ओढणी घेतलेली नव्हती. त्यांच्या कपाळावर कुंकू किंवा टिकली नव्हती. पुष्कळशा मुली सिगारेट ओढत होत्या.

सौ. स्वाती शिंदे

४. बसमधील वातावरणाचा त्रास होऊनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी संरक्षककवचामुळे स्थिर रहाता येणे : बस निघण्याची वेळ झाली. सर्व माणसे बसमध्ये बसल्यावर आमच्या लक्षात आले, ‘बसमध्ये धर्मांध आणि व्यसनाधीन माणसे आहेत.’ ‘वाहनचालकाला झोप येऊ नये’, यासाठी त्याच्याशी एक माणूस बोलत होता. त्याने चालकाला तंबाखूसारखा पदार्थ दिला. तो अनावश्यक गप्पा मारत होता. त्यामुळे बसमधील वातावरण अत्यंत त्रासदायक झाले होते. समाजातील लोकांसाठी ते नेहमीचेच वातावरण होते. त्यामुळे त्यांना काही वाटत नसावे; पण आम्ही श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) संरक्षककवचात रहात असल्यामुळे आम्हाला त्या वातावरणाचा पुष्कळ त्रास होत होता; मात्र ‘केवळ श्री गुरूंनी दिलेल्या चैतन्यदायी उपायांमुळे आम्ही स्थिर राहू शकलो. श्री गुरु साधकांसाठी किती करत आहेत !’, या विचारांनी आम्हाला कृतज्ञता वाटली.

५. वाहनांतील स्पंदनांचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असणे : या बसमधून प्रतिदिन अनेक जण प्रवास करतात. ‘प्रवाशांचे अयोग्य वागणे आणि विचार करणे, यांचा बसमधील वातावरणावर परिणाम होऊन बसमधील स्पंदने बिघडतात’, असे माझ्या लक्षात आले. ‘याची वाहनचालक किंवा वाहनाचे मालक यांना किती कल्पना असेल ? किंवा त्या दृष्टीने ते किती उपाययोजना काढत असतील ?’, हा प्रश्नच आहे.

६. सनातनच्या वाहनांमध्ये अधिक प्रमाणात चैतन्य असल्यामुळे त्यांतून प्रवास करतांना सुरक्षित वाटणे : ही सर्व स्थिती पाहिल्यावर आमच्या लक्षात आले, ‘सनातनच्या साधकांवर परात्पर गुरु डॉक्टरांनी किती चांगले संस्कार केले आहेत ! परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या अडचणींवर आध्यात्मिक स्तरावरच्या उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यामुळे चैतन्यनिर्मिती होऊन अडचणी सुटतात आणि देवावरील श्रद्धाही वाढते.’ क्षणभर माझी त्या वाहनाची तुलना सनातन आश्रमातील वाहनांशी झाली. आश्रमाच्या वाहनांमध्ये अधिक प्रमाणात चैतन्य आहे. त्यामुळे त्या वाहनांतून प्रवास करतांना सुरक्षित वाटते. ‘आश्रमातील वाहन मार्गावरून जाते, तसतसे त्यातून चैतन्य प्रवाहित होऊन त्या मार्गाची शुद्धी होते’, असे माझ्या लक्षात आले.

परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करायला शिकवल्यामुळे अशा घोर कलियुगातही केवळ त्यांच्या कृपेमुळे सनातनच्या प्रत्येक साधकाला क्षणोक्षणी चैतन्याची अनुभूती घेता येत आहे.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२२)