मूर्तीच्या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवण्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांचे सुतोवाच !
कोल्हापूर, १७ मार्च (वार्ता.) – पुरातत्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करावेत. श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती सुस्थितीत नसेल, तर श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्ती पालटण्याच्या संदर्भात धर्माचार्य, करवीरपीठ-शृंगेरीपीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे. मूर्ती पालटण्याच्या संदर्भात ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या कृती तात्काळ चालू कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देवीभक्त सकल हिंदु समाजाच्या वतीने १७ मार्चला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. ‘मूर्तीच्या संदर्भात सर्व अहवाल सिद्ध करून आम्ही शासनाकडे पाठवणार असून त्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल’, असे जिल्हाधिकार्यांनी देवीभक्त सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले.
या प्रसंगी दशनाम गोस्वामी आखाड्याचे हिंदु धर्मगुरु आणि आंतरराष्ट्रीय योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी, सचिव डॉ. सुशील अग्रवाल, ‘रोखठोक’चे संपादक डॉ. सुरेश राठोड, ‘देवीभक्त सकल हिंदु समाजा’चे सर्वश्री शरद माळी, राजू यादव, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.
पुरातत्व विभागाने जरी ‘मूर्ती चांगली आहे’, असा निर्वाळा दिला असला, तरी यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमुळे, तसेच काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे ‘मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे ?’ याविषयी देवीभक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे वर्ष २०१५ मध्ये झालेले रासायनिक संवर्धन योग्य झाले नाही कि मूर्तीची स्थिती चांगली नाही ?, याविषयी प्रश्नचिन्ह असून त्याचे उत्तर अद्याप देवीभक्तांना मिळालेले नाही. याविषयी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने खुलासा होणे आवश्यक आहे, अशीही मागणी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे निवेदनात करण्यात आली आहे.