सत्ताधार्‍यांना गांभीर्य नसून भोंगळ कारभार चालू आहे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून खडाजंगी !

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – विधानसभेत यापूर्वी २ वेळा मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. तोच प्रत्यय १७ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांना पुन्हा पहायला मिळाला. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा चालू असतांना विविध विभागांचे मंत्री अनुपस्थित असल्याने त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. मी अधिवेशन चालू झाल्यापासून सांगत आहे की, सत्ताधार्‍यांना गांभीर्य नाही. सभागृहात अक्षरश: भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिल्या बाकड्यावर कुणीही मंत्री नसतो. आम्हीही सरकार चालवले आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांना सुनावले.

मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला कामकाजाचे गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बर्‍याच वेळा अनुपस्थित रहात असतांना अशी प्रसन्नता का व्यक्त केली नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे उपस्थित नसले, तरी मी सकाळी ९ वाजल्यापासून विधानसभेत उपस्थित रहात होतो, असे सांगितले.