शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक मूळ जागीच उभारणार ! – दादा भुसे यांची विधानसभेत माहिती

शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक

पुणे – डिसेंबर २०१९ मध्‍ये मेट्रो स्‍थानकाचे काम चालू झाल्‍यामुळे शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात वाकडेवाडी येथील शासकीय डेअरीच्‍या जागेत स्‍थलांतरित केले होते. मूळ स्‍थानकापासून ते अर्धा किलोमीटर अंतरावर होते. मेट्रोच्‍या भूमीगत स्‍थानकाचे काम ३१ मे २०२२ या दिवशी पूर्ण झाले आहे. समांतर पद्धतीने बसस्‍थानकाचे काम चालू व्‍हायला हवे होते. सामंजस्‍य करार करतांना कशा पद्धतीने काम करायचे ? कुणाचा किती हिस्‍सा असेल या संदर्भात निर्णयही झाला होता, तसेच मेट्रो आणि महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाची बैठकही झाली आहे. त्‍यामुळे शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक मूळ जागी २ वर्षांत उभे रहाणार आहे. एकात्‍मिक विकास आराखड्याअन्‍वये हे काम करण्‍याचे नियोजन आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर बस स्‍थानकाच्‍या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्‍यावर भुसे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.