साधकांना आधार देणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर श्रद्धा असणारे चि. सागर शिरोडकर अन् प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणार्‍या चि.सौ.कां. स्नेहा सावंत !

१७.३.२०२३ या दिवशी हडपसर (पुणे) येथील चि. सागर प्रभाकर शिरोडकर आणि कालेली (कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील चि.सौ.कां. स्नेहा सदानंद सावंत यांचा शुभविवाह आहे. त्‍यानिमित्त संत आणि सहसाधक यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

चि. सागर शिरोडकर आणि चि.सौ.कां. स्नेहा सावंत यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !


चि. सागर शिरोडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

१. पू. (सौ.) मनीषा महेश पाठक, पुणे

पू. (सौ.) मनीषा पाठक

१ अ. नम्रता आणि साधकांविषयीचा आदरभाव : ‘सागरदादाने एखाद्या साधकाला सेवा सांगितल्‍यावर आणि त्‍या साधकाने सेवा केल्‍यावर दादा लगेच कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी हात जोडतो. दादाची ही कृती इतकी सहजतेने होते की, ती पहातांना भावजागृती होते. त्‍याच्‍या बोलण्‍यातून इतरांप्रती आदर आणि साधकांनी केलेल्‍या सेवेप्रती कृतज्ञता दिसून येते.

१ आ. सेवेची तळमळ : तो व्‍यवसाय सांभाळून मिळालेल्‍या वेळेत सेवा करण्‍याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्‍याला कामामुळे थकवा आला असला, तरी तो सेवा करण्‍यासाठी तत्‍पर असतो. त्‍याच्‍या तळमळीमुळे त्‍याने हडपसर येथील अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि धर्मप्रेमी यांना जोडून ठेवले आहे.

१ इ. स्‍वीकारण्‍याची वृत्ती : कौटुंबिक जीवनात किंवा वैयक्‍तिक स्‍तरावर अडचणी आल्‍या, तरीही दादा सकारात्‍मक असतो. त्‍याच्‍या बोलण्‍यात परिस्‍थितीविषयी कधीही गार्‍हाणे नसते. ‘तो कधीही निराश अथवा दु:खी झाला आहे’, असे नसते. तो नेहमी आनंदी असतो. त्‍याने एका सेवेच्‍या निमित्ताने प्रसाराचे दायित्‍व १ मास तळमळीने सांभाळले. प्रतिदिन रात्री ‘दिवसभर झालेल्‍या प्रसाराचा आढावा घेणे आणि दुसर्‍या दिवशीचा समन्‍वय करणे’, ही सेवा तो न थकता करत असे. गुरुदेवांचे स्‍मरण करत दादा ही सेवा करत असे.’

(१५.३.२०२३)

२. श्री. महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ वर्षे, वय ४३ वर्षे), पुणे

२ अ. स्‍वतःला पालटण्‍याची तळमळ : ‘एकदा रामनाथी येथे झालेल्‍या सत्‍संगात गुरुमाऊलींनी सांगितले, ‘‘साधकांची व्‍यष्‍टी साधना चांगली होत नाही.’’ तेथून आल्‍यावर दादाने स्‍वतःमधील स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या पैलूंची व्‍याप्‍ती उत्तरदायी साधकांना पाठवली. आता तो त्‍यानुसार कृतीही करत आहे.

२ आ. भाव : दादा नेहमी भावावस्‍थेत असतो. त्‍याचा गुरुदेवांप्रती पुष्‍कळ भाव आहे. एकदा मी त्‍याला माझ्‍या जवळ असलेल्‍या गुरुदेवांच्‍या २ छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दिले. त्‍यानंतर तो प्रत्‍येक सत्‍संगात ते छायाचित्र समोर ठेवतो. सत्‍संगात सांगितले जाणारे प्रत्‍येक सूत्र भावपूर्ण श्रवण करून तो त्‍याप्रमाणे आचरण करण्‍याचा प्रयत्न करतो.’

३. सौ. रीमा नान्‍नीकर, पुणे

३ अ. प्रेमभाव : ‘मी वैद्यकीय शिक्षणासाठी ‘हॉस्‍टेल’वर रहात असतांना मला अनेक वेळा सागरदादाच्‍या घरी रहाण्‍याचा योग आला. त्‍या वेळी त्‍याच्‍या माध्‍यमातून मला लहान भाऊ आणि प्रेमळ कुटुंब लाभले. माझे शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर अनुमाने १० वर्षे मी पुण्‍यात नव्‍हते, तरीही मी दादाच्‍या संपर्कात होते. मला सेवेत काही साहाय्‍य हवे असल्‍यास आजही मला दादाचा आधार वाटतो.

३ आ. उत्तम संघटनकौशल्‍य : दादाचा मित्रपरिवार मोठा आहे. दादा त्‍याच्‍या मित्रांना विविध उपक्रमांमध्‍ये सहभागी करून घेतो. दादामध्‍ये उपजतच समाजातील व्‍यक्‍ती आणि साधक यांना साधनेत जोडून ठेवण्‍याचे उत्तम कौशल्‍य आहे. दादाने अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ, धर्मप्रेमी आणि अन्‍य संप्रदायांच्‍या माध्‍यमातून साधना करणारे साधक यांना विविध माध्‍यमांतून जोडून ठेवले आहे अन् त्‍यांच्‍याशी जवळीक साधली आहे.

३ इ. गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणे : कोरोनाच्‍या काळात काही साधक आणि साधकांचे कुटुंबीय रुग्‍णाईत होते. काही साधकांचे निधन झाले. तेव्‍हा ‘त्‍यांना रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करून देणे, रुग्‍णालयात प्रवेश मिळवून देणे, स्‍मशानभूमीत जाणे’ इत्‍यादी सेवा दादाने स्‍वतःच्‍या जिवाची तमा न बाळगता केली. यातून त्‍याची गुरुदेवांवर (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर) अपार श्रद्धा असल्‍याचे लक्षात आले. त्‍या कालावधीत मला दादाचा पुष्‍कळ आधार वाटला.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.३.२०२३)


चि.सौ.कां. स्नेहा सावंत यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

१. श्री. अमित हडकोणकर आणि कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘स्नेहा ठरलेल्‍या वेळेत सेवेसाठी उपस्‍थित असते. ती आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन करते.

१ आ. ती मिळेल त्‍या सेवेतून आनंद घेते आणि हसतमुख रहाते.

१ इ. प्रेमभाव आणि मनमोकळेपणा : स्नेहाला कुणी सेवेसाठी साहाय्‍य मागितल्‍यास ती सहजतेने त्‍यांना साहाय्‍य करते. तिच्‍यामध्‍ये प्रेमभाव असल्‍यामुळे ती आश्रमातील वेगवेगळ्‍या साधकांशी चांगल्‍या प्रकारे जुळवून घेते. ती मनमोकळेपणाने बोलते. त्‍यामुळे तिचे बोलणे ऐकायला चांगले वाटते.

१ ई. नेतृत्‍वगुण : स्नेहामध्‍ये उत्तम नेतृत्‍वगुण आहे. आश्रम स्‍तरावरील अल्‍पाहाराचे नियोजन करण्‍याची सेवा तिने दायित्‍व घेऊन प्रेमाने केली.

१ उ. स्नेहाच्‍या सेवेमध्‍ये नियमितपणा, चिकाटी आणि परिपूर्णता असते. ‘तिला दिलेली सेवा ती वेळेत आणि परिपूर्ण करणारच’, याची निश्‍चिती असते.

१ ऊ. तत्त्वनिष्‍ठता : विज्ञापनांच्‍या सेवेसाठी ती प्रसारातील साधकांशी समन्‍वय करते. ती साधकांकडून होत असलेल्‍या चुका प्रेमाने सांगून त्‍यांच्‍याकडून तसे पालटही करून घेते.

१ ए. चुकांविषयीची संवेदनशीलता : ती तिच्‍याकडून झालेल्‍या चुका मनमोकळेपणाने सांगते, तसेच तिला तिच्‍याकडून झालेल्‍या चुकांविषयी पुष्‍कळ खंत वाटते. ‘त्‍या चुका पुन्‍हा होणार नाहीत’, याची ती काळजी घेते.

१ ऐ. सेवेची तळमळ : स्नेहाने विज्ञापनांची सेवा अल्‍प कालावधीत आत्‍मसात केली आणि सर्व साधकांचा विश्‍वास संपादन केला. प्रसारातील साधकांशीही जवळीक साधून आणि त्‍यांच्‍या अडचणी समजून घेऊन त्‍या सोडवण्‍यासाठीही ती साहाय्‍य करायची.

१ ओ. गुरुदेव आणि संत यांच्‍याप्रतीचा भाव : स्नेहामध्‍ये आश्रमातील सर्व संत आणि परात्‍पर गुरुदेव यांच्‍याप्रती भाव आहे. गुरुदेवांच्‍या आठवणीने तिचे डोळे पाणावतात. त्‍यांच्‍याबद्दल बोलतांना तिच्‍या चेहर्‍यावरील हावभाव लहान मुलीसारखे निरागस जाणवतात.’

२. सौ. भाग्‍यश्री सावंत (कु. स्नेहा यांची वहिनी, चुलतभावाची पत्नी) आणि सौ. समीक्षा गाडे (कु. स्नेहा यांची चुलत बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्‍यास आरंभ करणे : ‘पूर्वी स्नेहा गोव्‍यात नोकरी करत होती. साधनेचे महत्त्व पटल्‍यावर तिने पूर्णवेळ साधना करण्‍यास आरंभ केला. ती नोकरी चालू ठेवून आर्थिकदृष्‍ट्या स्‍थिर होऊ शकली असती; मात्र तिने साधनेला प्राधान्‍य देऊन रामनाथी येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला.

२ आ. मितभाषी आणि नम्र : स्नेहा अल्‍प बोलते, तसेच ती नम्र आहे. ती कधीच कुणाचे मन दुखावेल, असे बोलत नाही. इतरांचे काही पटले नाही, तर प्रतिक्रिया व्‍यक्‍त न करता ती शांत रहाते.

२ इ. शारीरिक त्रास होत असतांनाही विश्रांतीसाठी घरी न जाता आश्रमात रहाण्‍यास प्राधान्‍य देणे : स्नेहाला पायदुखीचा त्रास आहे. त्‍यामुळे तिला पुष्‍कळ शारीरिक त्रास होतो. अशा वेळी कुटुंबीय तिला विश्रांती घेण्‍यासाठी घरी बोलावतात; मात्र तरीही ती घरी जाऊन विश्रांती न घेता आश्रमात राहून नामजपादी उपाय करणे इत्‍यादी गोष्‍टींना प्राधान्‍य देते. ‘आश्रमात राहून नामजपादी उपाय केल्‍यानेच त्रास न्‍यून होईल’, असा तिचा भाव आहे.

विविध गुणांनी नटलेली आमची स्नेहा पुढील सहजीवनासाठी मार्गस्‍थ होत आहे. ‘गुरुदेवांनी तिचे पुढचे जीवन साधनामय करावे, व्‍यवहारातही या गुणांनी सर्वांचे मन जिंकून तिने गुरुप्राप्‍तीसाठी पात्र व्‍हावे’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’

३. श्री. सुरजित माथूर, सनातन आश्रम, रामनाथी

विज्ञापनांच्‍या सेवेच्‍या संदर्भात प्रसारातून साधकांनी भ्रमणभाष केला, तर कु. स्नेहा त्‍यांना पूर्ण सहकार्य करायची आणि साधकांना विज्ञापन सेवेत येणार्‍या अडचणी लगेच सोडवायची. तिच्‍यामध्‍ये शिकण्‍याची वृत्ती होती. सेवा तळमळीने, परिपूर्ण आणि ईश्‍वराला समर्पित करून कशी करायची ? हे स्नेहाकडून मला शिकायला मिळाले.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ११.३.२०२३)

उखाणे

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे

  निळ्‍या आकाशी शोभती चंद्र अन् तारे ।
    …. च्‍या साथीने उजळो आध्‍यात्मिक जीवन सारे ॥

 गंध आहे फुलात, भाव आहे अंतःकरणात ।
    ….च्‍या साथीने तरीन मी भवसागरात ॥