परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवरील दृढ श्रद्धेमुळे परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदी रहाणारे नांदेड येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४२ वर्षे) !

श्री. शांताराम बेदरकर

१. श्री. शांताराम बेदरकर यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के होण्‍यापूर्वी साधकांना मिळालेल्‍या पूर्वसूचना

१ अ. श्री. उदय बडगुजर, जळगाव

१ अ १. पहाटे स्‍वप्‍नात ‘साधक जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाले असून भावसोहळा चालू आहे’, असे दिसणे : ‘एकदा मला पहाटे स्‍वप्‍नात ‘साधक जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाले असून भावसोहळा चालू आहे’, असे दिसले. त्‍या दिवशी सद़्‍गुरु नंदकुमार जाधवकाकांनी शांतारामदादांची आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के झाल्‍याचे सांगितल्‍यावर मला स्‍वप्‍नाचा भावार्थ लक्षात आला.’ (श्री. शांताराम बेदरकर यांची आताची आध्‍यात्‍मिक पातळी ६२ टक्‍के आहे.)

१ आ. सौ. गौरी आफळे, फोंडा, गोवा.

१ आ १. रामनाथी आश्रमात आल्‍यावर शांतारामदादांचा सर्व साधकांकडे पाहून भाव जागृत होत असल्‍याचे पाहून ‘दादांची आध्‍यात्‍मिक उन्‍नती झाली आहे’, असे वाटणे : ‘मार्च २०२० मध्‍ये शांतारामदादा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. तेव्‍हा सर्व साधकांकडे पाहून त्‍यांचा भाव जागृत होत होता. ‘प्रत्‍येक साधकाच्‍या चेहर्‍यावरील चैतन्‍य पाहून आश्रमातील चैतन्‍याचाच हा परिणाम आहे आणि या आश्रमातील चैतन्‍याचा लाभ मी किती करून घेऊ ?’, असेच त्‍यांना वाटत होते. तेव्‍हा ‘दादांची आध्‍यात्‍मिक उन्‍नती झाली आहे’, असे मला वाटले.’

२. गुणवैशिष्‍ट्ये

२ अ. होमिओपॅथी वैद्या (सौ.) तेजस्‍विनी पांडे, नांदेड

२ अ १. आनंदी आणि प्रेमळ : ‘दादांची आणि आमची ओळख झाल्‍यापासूनच मी त्‍यांना सतत हसतमुख पाहिले आहे. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून त्‍यांना ‘सेवा किंवा परिस्‍थिती यांचा ताण आहे’, असे कधीही जाणवत नाही. ते साधक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक यांच्‍याशी प्रेमाने बोलतात अन् सर्वांची आस्‍थेने विचारपूस करतात.’

२ आ. श्री. वैभव आफळे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) 

२ आ १. कर्तेपणा नसणे : ‘दादांची ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी घोषित झाल्‍यानंतर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘साधकांनीच मला सर्व शिकवले. माझ्‍यात स्‍वभावदोष आहेत. ते नाहीसे होण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’ त्‍या वेळी मला त्‍यांच्‍यातील ‘कर्तेपणा न घेणे’ हा गुण लक्षात आला.’

२ इ. सौ. कल्‍पना गडम, परभणी 

२ इ १. परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे : ‘दादांना वैयक्‍तिक जीवनात अनेक अडचणी असूनही त्‍यांचे परिस्‍थितीविषयी काहीच गार्‍हाणे नसते. ‘हे माझे प्रारब्‍ध असून मला ते फेडायचे आहे’, असा त्‍यांचा भाव असतो. ‘कितीही अडचणी आल्‍या, तरी खचून न जाता श्रद्धेच्‍या बळावर आनंदी कसे रहायचे ?’, हे मला दादांच्‍या माध्‍यमातून गुरुमाऊलीने शिकवले.

२ ई. श्री. प्रकाश पांडे (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के), नांदेड (वय ७३ वर्षे)  

२ ई १. साधनेची तीव्र तळमळ : ‘शांतारामदादांचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याची सेवा माझ्‍याकडे आहे. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाल्‍यावर त्‍यांना ‘नियमित नामजप केल्‍याने येणार्‍या आनंदाच्‍या अनुभूतीविषयी सांगून त्‍यात सातत्‍य ठेवणे आणि प्रत्‍येक कृती करतांना वेगवेगळे भावप्रयोग करणे’ यांविषयी सांगितल्‍यावर त्‍यांच्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या प्रयत्नांत आता सातत्‍य आले असून त्‍यांना आनंद मिळत आहे’, असे लक्षात आले.

ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रत्‍येक वर्गणीदारांना तळमळीने नामजपाचे महत्त्व आणि साधना सांगतात. हे सर्व त्‍यांनी अतिशय खडतर परिश्रमातून साध्‍य केले.’

२ उ. श्री. गिरीश रघोजीवार, देहली

२ उ १. परेच्‍छेने वागणे : दादा कधीही मनाप्रमाणे वागत नाहीत. उत्तरदायी साधकांनी सांगितल्‍याप्रमाणे कृती करणे त्‍यांना कितीही कठीण वाटले, तरी आज्ञापालन म्‍हणून दादांचा ती कृती आनंदाने आणि परिपूर्ण करण्‍याचा प्रयत्न असतो.

२ उ २. शरणागतभाव : शांतारामदादा म्‍हणजे शरणागतभावाची प्रतिकृती. दादांमधील शरणागतभाव त्‍यांच्‍या चेहर्‍यावर स्‍पष्‍टपणे दिसतो.’

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक