६५ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीचे कै. विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा श्री. अभय वर्तक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील श्री. विजय (नाना) वर्तक (आध्‍यात्‍मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७७ वर्षे) यांचे ९.११.२०२२ या दिवशी नागोठणे येथील त्‍यांच्‍या रहात्‍या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. श्री. अभय वर्तक यांना त्‍यांच्‍या वडिलांच्‍या निधनानंतर आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

‘माझे वडील ‘नाना’ यांची आध्‍यात्मिक पातळी चांगली (६५ टक्‍के) होती. त्‍यांच्‍या निधनानंतर अनेक अलौकिक घटना घडल्‍या आणि त्‍या मला प्रत्‍यक्ष अनुभवता आल्‍या.

कै. विजय (नाना) वर्तक

१. ‘नानांचे निधन झाल्‍यानंतरही घरातील स्‍पंदने चांगली आहेत’, असे नातेवाइकांना जाणवणे 

घरातील व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर घरात रज-तम गुणांची स्‍पंदने निर्माण होणे स्‍वाभाविक आहे; पण ‘नानांच्‍या निधनानंतरही आमच्‍या घरातील स्‍पंदने चांगली होती’, हे आमच्‍या नातेवाइकांच्‍याही लक्षात आले.

२. चौथ्‍या दिवशी कै. नानांसाठी लावलेला दिवा सर्व बाजूंनी पूर्ण पेटणे, सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्‍याचे कारण विचारल्‍यावर त्‍यांनी ‘नानांना पुढची गती वेगाने मिळाल्‍याचे हे लक्षण आहे’, असे सांगणे

श्री. अभय वर्तक

घरातील व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍यावर घरात सतत १० दिवस दक्षिण दिशेला तोंड करून दिवा तेवत ठेवला जातो. नानांच्‍या निधनानंतर लावलेला दिवा चौथ्‍या दिवशी पूर्ण पेटला. पणतीच्‍या बाहेरच्‍या बाजूनेही दिवा पेटला होता. त्‍या ज्‍वाळा दिव्‍याच्‍या बाजूला ठेवलेल्‍या विटांच्‍या वरपर्यंत दिसत होत्‍या. त्‍याकडे पहातांना चांगले वाटत होते. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘नानांना पुढची गती वेगाने मिळाल्‍याचे हे लक्षण आहे.’’

३. कै. नानांच्‍या उत्तरकार्यासाठी मिळालेले सात्त्विक गुरुजी !

नानांचे मृत्‍यूनंतरचे विधी करण्‍यासाठी सात्त्विक गुरुजी मिळाले. त्‍यांनी ‘स्‍मशानातील आणि दहाव्‍या दिवसापासून तेराव्‍या दिवसांपर्यंतचे अन् १४ व्‍या दिवशी उदकशांत’ हे सर्व विधी भावपूर्ण अन् शास्‍त्रशुद्ध पद्धतीने केले.

३ अ. बाराव्‍या दिवशी हवनात भाताची दिलेली आहुती तडकून बाहेर उडणे, तेव्‍हा गुरुजींनी ‘नानांना वेगाने गती मिळाल्‍याचे हे लक्षण असून ‘ही एक अलौकिक घटना अनुभवता आली’, असे सांगणे : बाराव्‍या दिवशी हवनात भाताची दिलेली आहुती तडकून बाहेर उडत होती. तेव्‍हा गुरुजी म्‍हणाले, ‘‘आतापर्यंत असे कधी झाले नाही. ही एक अलौकिक घटना अनुभवता आली. ‘नानांना वेगाने गती मिळाली’, याचे हे लक्षण आहे.’’

३ आ. विधी करणार्‍या गुरुजींचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती असलेला भाव ! : शेवटच्‍या दिवशी गुरुजी म्‍हणाले, ‘‘मी अनेक जणांचे विधी करतो; पण या वास्‍तूमधे विधी करतांना आम्‍हाला आनंद मिळाला.  ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मस्‍थानी विधी करता आले’, हे आमचे भाग्‍य आहे.’’

४. कै. नानांनी समाजातील लोकांना चांगल्‍या प्रकारे जोडून ठेवलेले असणे 

आमच्‍याकडे प्रतिदिन पुष्‍कळ लोक भेटायला येत होते. ३० वर्षांपूर्वी नानांकडे श्री. आणि सौ. कुंभार भाडेकरू म्‍हणून रहात होते. ते कोल्‍हापूर येथून मला भेटायला आले होते. प्रतिदिन गावातील ठाकूरवाडी येथील आदिवासी मंडळींपैकी कुणी ना कुणी भेटायला येत आणि ‘‘काही साहाय्‍य हवे का ?’’, असे विचारत होते. आमच्‍या घराजवळील आळीतील अनेक जण आपणहून नानांच्‍या पुढील कार्यासाठी साहाय्‍य करायला आले होते.

यातून ‘नानांनी सर्वांशी चांगले संबंध जोडून ठेवले होते’, हे माझ्‍या लक्षात आले.

५. समाजाला साधनेकडे वळवण्‍यासाठी प्रयत्न करणे

नानांना ‘समाजाने साधनेकडे वळावे’, असे नेहमी वाटायचे. ते त्‍यांना भेटलेल्‍या प्रत्‍येकाला नामजप करायला सांगत आणि त्‍यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील काही महत्त्वाची सूत्रे वाचून दाखवत.

६. वडिलांशी मित्रत्‍वाचे नाते असणे

नानांचे निधन झाल्‍यावर मी वरून खंबीर राहिलो असलो, तरी मला मनातून पुष्‍कळ दु:ख झाले होते. नाना आणि माझे नाते वडील अन् मुलगा यापेक्षा मित्रत्‍वाचे अधिक होते. त्‍यांचा मला भ्रमणभाष आल्‍यावर किंवा मी त्‍यांना केल्‍यावर आमचे बोलणे बराच वेळ चालायचे. आम्‍ही कितीही बोललो, तरी मला ते अल्‍पच वाटायचे.

७. कृतज्ञता

नानांची वास्‍तू ही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्‍मस्‍थान आहे. ‘मला या वास्‍तूमध्‍ये लहानपणापासून रहायला मिळाले’, यासाठी जेवढी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तेवढी ती अल्‍पच आहे. ‘त्‍यांना अपेक्षित असे’, या वास्‍तूचे संवर्धन करण्‍याची सेवाही तेच करून घेणार आहेत. ‘मी निमित्तमात्र आहे’, याची मला पदोपदी जाणीव होते. भविष्‍यात या वास्‍तूचे रूपांतर एका भव्‍य तीर्थक्षेत्रात होईल. आताही नागोठणे येथे येणार्‍या प्रत्‍येकाला तिथे एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी स्‍पंदने जाणवतात.

‘बर्‍याच दिवसांपासून माझ्‍या मनात ‘नानांविषयी लिखाण करावे’, असे विचार येते होते; पण मला प्रेरणाच होत नव्‍हती. ‘आज श्री गुरूंनी माझ्‍याकडून नानांविषयी लिखाण करून घेतले’, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था, देहली सेवाकेंद्र (३१.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक