विष्‍णुमुद्रेसहित अनुलोम-विलोम प्राणायाम केल्‍याने नगर येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य रवींद्र भोसले यांना झालेले लाभ

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, म्‍हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’, असे वचन आहे. सर्वांना ‘साधनेसाठी शरीर चांगले असणे आवश्‍यक आहे’, हे ठाऊक असूनही बहुतेक जण शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. शरीर हे मनाचे स्‍थूल रूप असल्‍याने मनःस्‍वास्‍थ्‍यासाठीही ते सुदृढ ठेवणे आवश्‍यक आहे. ‘सर्व वयोगटांतील साधकांसाठी करता येईल’, असा एक सोपा उपाय म्‍हणजे अनुलोम-विलोम प्राणायाम ! त्‍याचे काही मी अनुभवलेले लाभ पुढे दिले आहेत.

आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले

१. वजन घटणे  

माझे वजन पूर्वी ७९ किलो होते. इतर व्‍यायाम आणि अनुलोम-विलोम केल्‍याने आता ते ७१ किलो झाले आहे.

विष्‍णुमुद्रा

२. रक्‍तदाब सामान्‍य (नॉर्मल) होणे  

पूर्वी माझा खालचा रक्‍तदाब (Diastolic) ९० च्‍या पुढेच असायचा. आता तो ९० च्‍या आत आला आहे. (१२०/८० या रक्‍तदाबाच्‍या नोंदीमध्‍ये १२० हे वरचा रक्‍तदाब (Systolic), तर ८० हा खालचा रक्‍तदाब (Diastolic) असे म्‍हणतात. खालचा रक्‍तदाब सतत ९० च्‍या पुढे राहिला, तर रक्‍तदाब नियंत्रित रहाण्‍यासाठी गोळी चालू करावी लागते.)

३. थकवा उणावून उत्‍साह जाणवणे आणि प्राणशक्‍ती वाढणे  

अनुलोम-विलोममुळे प्राणशक्‍तीवहन नाड्यांतील अडथळा दूर झाल्‍याने ‘उत्‍साह जाणवणे आणि प्राणशक्‍ती वाढते’, असे मला वाटते.

४. अर्धशिशीचा (मायग्रेनचा) त्रास अल्‍प होणे  

अर्धशिशीचे (‘मायग्रेन’चे) प्रकटीकरण हे ताणाशी संबंधित असल्‍याने अनुलोम-विलोम केल्‍याने ताण न्‍यून होऊन अर्धशिशीच्‍या प्रकटीकरणाची वारंवारता अतिशय अल्‍प झाली आहे.

५. पोटाच्‍या सर्व तक्रारी न्‍यून होणे

बहुतांश लोकांना आम्‍लपित्तामुळे (अ‍ॅसिडिटीमुळे) ढेकरा येणे किंवा शौचास साफ न होणे, हे त्रास होत असतात. अनुलोम-विलोममुळे माझे हे त्रास पुष्‍कळ अल्‍प झाले आहेत.

विष्णुमुद्रा करत अनुलोम – विलोम प्राणायाम करतांना डॉ. रविंद्र भोसले

६. श्‍वसनसंस्‍थेचे ‘अ‍ॅलर्जी’सारखे विकार न्‍यून होणे  

थंडी पडली की, श्‍वास घेतांना माझ्‍या छातीतून आवाज यायचा. आता तो येत नाही.

७. ताण किंवा चिंता न्‍यून होणे  

अनुलोम-विलोम करतांना श्‍वासाला जोडून नामजप केल्‍याने ताण किंवा चिंता दूर होते.

८. मनाची एकाग्रता वाढणेे  

अनुलोम-विलोम करतांना श्‍वासाला जोडून नामजप केल्‍याने मनाचे भरकटणे थांबून एकाग्रता वाढते.

९. शांत झोप लागणे  

अनुलोम-विलोम केल्‍याने झालेल्‍या लाभामुळे झोप शांत लागते.

‘प्रत्‍येक साधकाने हा प्राणायाम प्रतिदिन न्‍यूनतम २० मिनिटे तरी करावा, म्‍हणजे साधना अधिक जोमाने करता येईल’, असे मला वाटते. याचे लाभ दिसायला न्‍यूनतम ३ मास लागतात.

टीप – विष्‍णुमुद्रा ही उजव्‍या हातानेच करावी आणि डाव्‍या हाताने ध्‍यानमुद्रा करावी. प्राणायाम करतांना जमेल तेवढे ताठ बसण्‍याचा प्रयत्न करावा.

– आधुनिक वैद्य रवींद्र भोसले, ‘शल्‍यचिकित्‍सक आणि पोटविकार शस्‍त्रक्रिया तज्ञ’, नगर. (१६.९.२०२२)