‘२८.३.२०२० या दिवशी आम्ही कुटुंबियांनी एकत्र नामजप केला. नामजप करण्यापूर्वी आम्ही प्रार्थना केली अन् प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेली भजने हळू आवाजात लावली. एकाग्रतेने नामजप चालू असतांना मला प.पू. भक्तराज महाराजांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्याविषयी आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांचे झालेले दर्शन आणि त्यांच्याशी झालेले संभाषण
१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः हात धरून रामनाथी आश्रमात नेल्याचे सूक्ष्मातून दिसणे आणि तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे : प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) माझा हात धरला आणि मला ‘चल’ असे म्हणाले. प.पू. बाबा मला रामनाथी आश्रमातील यागाच्या स्थळी घेऊन आले. त्या वेळी मला आश्रमाचे दर्शन झाले. त्यानंतर प.पू. बाबा मला सभागृहामध्ये घेऊन गेले. तिथे विशेष याग चालू होता. यागाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टर नमस्कार मुद्रेत गुलाबी उश्या असणार्या आसंदीवर विराजमान असलेले दिसले.
१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी सूक्ष्मातून संभाषण होणे : प.पू. भक्तराज महाराज आणि माझ्यामध्ये ५ ते ६ मिनिटे संभाषण झाले. प.पू. बाबा म्हणाले, ‘आता तुझा डॉक्टर ‘जयंत’ आहे. आता हेच तुझे वैद्य (डॉक्टर) आणि तेच सर्वकाही पहातील.’ तेव्हा मला प.पू. बाबांविषयी कृतज्ञता वाटली आणि मी परात्पर गुरुदेवांचे दर्शन घेतले. त्यानंतर मला संपूर्ण सभागृहात आणि यागाच्या ठिकाणी केलेली मांडणी दिसली.
२. नामजपाच्या वेळी आनंद आणि शीतलता अनुभवणे
पुढे त्याच भावाने नामजप करत असतांना मी आनंद आणि शीतलता यांचा अनुभव घेतला. मी पुष्कळ वेळ सुखासनातच बसलो होतो, तरीही माझ्या पायाला काहीच संवेदना जाणवत नव्हत्या.
३. ‘गुरूंनी स्वतःहून हात पकडणे, म्हणजे साधकाला शिष्यत्वाकडे नेणे’, असा विचार मनात येणे
रात्री ९.३० वाजता ध्यानाच्या वेळी ध्यानावस्थेत असतांना मी ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी मला सूक्ष्मातून दिलेल्या दर्शनाचा अर्थ काय ?’, असे देवाला विचारले. तेव्हा ‘साधक म्हणजे लहान मूल. जेव्हा तो स्वतःहून गुरूंचे बोट पकडतो, तेव्हा तो साधक अवस्थेत असतो आणि जेव्हा गुरु स्वतःहून त्याचा हात पकडतात, तेव्हा ते मूल, म्हणजेच साधक शिष्यत्वाला येतो. गुरु स्वतःच आपल्या शिष्याला मोक्षाकडे नेतात आणि सर्वकाही तेच करून घेतात’, हे लक्षात आले.
४. सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्याविषयी वर्णन करतांना सुचलेली शब्दसुमने
सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्याविषयी वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नव्हते. मला पुष्कळ आनंद झाला होता. तेव्हा मनात आलेला भाव असा होता –
‘डोळा पाहोनिया हे । भरले माझे मन ।
उरी आता सांगाया । शब्द नाही ।।’
‘प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेमुळे ही अनुभूती आली अन् लिहूनही घेतली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शुभम सराफ, संभाजीनगर (२८.३.२०२०)
|