गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अवैध पार्टी, गोवा
(प्रतिकात्मक चित्र)

पेडणे, ९ मार्च (वार्ता.) – जागतिक महिला दिन, होळी आणि त्यानंतर धूलिवंदन या पार्श्वभूमीवर २ दिवस काही ठिकाणी संगीत रजनींना मुभा देण्यात आली होती; मात्र होळीच्या तिसर्‍या दिवशीही अश्वे-मांद्रे किनारी भागातील काही क्लब आणि उपाहारगृहे यांमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीत पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. ‘होळीच्या पार्ट्या’ म्हणून ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. यामधील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीचे सरपंच तथा अधिवक्ता अमित सावंत यांनी बंद केल्या.

मांद्रे पंचायतीचे सरपंच तथा अधिवक्ता अमित सावंत

सरपंच अधिवक्ता अमित सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन ‘तुमच्याकडे अनुज्ञप्ती नसतील, तर पार्ट्या बंद करा, अन्यथा पंचायतीच्या वतीने तुमच्यावर कठोर कारवाई करू’, अशी चेतावणी दिली. यानंतर काही जणांनी पार्ट्या बंद केल्या.

एका क्लबला १ मासासाठी अनुज्ञप्ती

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंच अधिवक्ता अमित सावंत यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.