अर्थसंकल्पाविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…

१. सर्वसमावेशक अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही गाजर हलवा तरी देत आहोत, त्यांनी (उद्धव ठाकरे) काहीच दिले नाही. आकडे फुगवण्यासाठी आम्ही अर्थसंकल्प मांडला नाही. आम्ही काही शिल्लक ठेवले नाही. अंदाजपत्रकाचे आकडे पाहिल्यानंतर त्यांना (विरोधी पक्षांना) बोलायला काही नव्हते. त्यांच्याकडे उत्तरच नाही. गेल्या १० ते १५ वर्षांतील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन ! त्यांनी अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प मांडला. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे.

२. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केलेला अर्थसंकल्प ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

अजित पवार, विरोधी पक्षनेते

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळयांसमोर ठेवून सिद्ध केलेला अर्थसंकल्प आहे. लोकसभेसमवेत त्यांना विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्ही सिद्धतेला लागलो आहोत. ‘होत नव्हते ते घोषित करा, पुढचे पुढे पाहू’, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. वीज, गॅस आणि पाणीपुरवठा सेवा यांकडे आजच्या अर्थसंकल्पात निधी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहूसाठी काही घोषणा करतील, असे वाटले होते; मात्र काहीच केले नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी काहीच घोषणा नाही.

३. हा ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प आहे ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गट प्रमुख

उद्धव ठाकरे, ठाकरे गट प्रमुख

अर्थसंकल्पात मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प आहे. महाविकास आघाडीची सत्ता असतांना केंद्र सरकार आमच्या बाजूला नव्हते. जी.एस्.टी.ची थकबाकी होती. आता महाशक्तीचा पाठिंबा असलेले सरकार कसे कारभार करत आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. शेतकर्‍यांसाठी काही घोषणा केल्या आहेत; पण शेतकर्‍यांना हमखास भाव कधी येणार, हे पहावे लागणार आहे. आजच्या अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय ? असा आहे.

४. नुसत्या घोषणा करून ठेवल्या ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

आम्ही जेव्हा अर्थसंकल्प मांडला होता, तेव्हा जी पंचसूत्री होती, तेच यांचे पंचामृत आहे. या अर्थसंकल्पात काहीही नाही. नुसत्या घोषणा करून ठेवल्या आहेत.

५. अर्थसंकल्प म्हणजे आमच्या पंचसूत्रीची ‘पंचामृत’ या गोड नावाखाली केलेली नक्कल ! – धनंजय मुंडे, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस

अर्थसंकल्प म्हणजे लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आहे. मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या पंचसूत्रीची ‘पंचामृत’ या गोड नावाखाली केलेली नक्कल आहे.


अर्थसंकल्पातील सर्व घोषणा प्रत्यक्षात आणू ! – देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री

अर्थसंकल्पानंतरची पत्रकार परिषद

राज्याच्या सकल उत्पनाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. केंद्रशासन आणि रिझर्व्ह बँक यांनी हे धोरण निश्चित करून दिले आहे. विकसनशील राज्य आहे, तोपर्यंत कर्जाची रक्कम अल्प होत नाही. कर्जाचा पैसा योग्य प्रकारे उपयोगात आणणे हे महत्त्वाचे आहे. अनेक राज्यांच्या कर्जाची रक्कम त्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या २६-२७ टक्क्यांपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्याच्या सकल उत्पनाच्या १७ टक्के कर्ज घेतले आहे. वित्तीय तूट काही प्रमाणात न्यून करण्यात यश आले आहे. आपली महसुली तूट राज्याच्या सकल उत्पनाच्या १ टक्क्याच्या आत आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही अनैसर्गिक वाढ करण्यात आलेली नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केली नसल्याविषयी विचारले असता हा प्रश्न न्यायालयात असल्यामुळे निधी घोषित करण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या सर्व घोषणा आम्ही प्रत्यक्षात आणू, असे आश्वासन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिले.