जालना येथील मोतीबाग तलावात मृत माशांचा खच !

जालना – शहराचे आकर्षण असलेल्‍या मोतीबाग तलावात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्‍यू झाला आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्‍यातील विषारी द्रव्‍य आणि रासायनिक पदार्थांची वाहतूक करणार्‍या ट्रकच्‍या ‘वॉशिंग सेंटर’चे पाणी तलावात मिसळत असल्‍यामुळे सहस्रो माशांचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. ४ मार्चपासून सहस्रो मृत मासे तलावाच्‍या पाण्‍यात तरंगतांना दिसत आहेत. मृत माशांचा खच पडलेला पाहून पशूधन विभागाच्‍या एका पथकाने मेलेल्‍या माशांचे नमुने पडताळणीसाठी नेले आहेत. मृत माशांचे नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्‍याचे पशूधन विकास अधिकारी डॉ. विजय झांबरे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने तलावातील मृत माशांचा खच गांधीनगर रेल्‍वे उड्डाणपुलाच्‍या खाली टाकला असल्‍याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. (प्रदूषणाच्‍या नावाखाली हिंदु सणांच्‍या वेळी उर बडवणारे पुरो(अधो)गामी प्रदूषणाच्‍या या समस्‍येवर काही भाष्‍य करत नाहीत, हे लक्षात घ्‍या ! – संपादक)

रासायनिक घटकांची वाहतूक केलेले ट्रक तलावाच्‍या पाण्‍यात धुतले जातात ! – उदय शिंदे, स्‍थानिक नागरिक

औद्योगिक वसाहतीतील घातक रसायनाची वाहतुकीची कामे केल्‍यानंतर संबंधित ट्रक मोती तलावामध्‍ये धुतले जातात. यात युरिया, रासायनिक खते, औषधी यांसह तेल, ग्रीस पाण्‍यात मिसळतात. वसाहतीतील अनेक कारखान्‍यांतील मळी, सांडपाणी तलावाच्‍या मागील भागातून सोडून देण्‍यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण कार्यालयात प्रचंड भ्रष्‍टाचार चालत आहे, ते याकडे दुर्लक्ष करतात ही वस्‍तूस्‍थिती आहे.