श्री अनंतानंद साईश यांनी त्यांचे शिष्य प.पू. भक्तराज महाराज यांना विविध प्रसंगांतून गुरुतत्त्वाची कशी प्रचीती दिली ? भजने लिहिण्यासाठी कशी प्रेरणा दिली ? आणि पूर्णत्वाला नेले, याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण येथे दिले आहे.
१. श्री अनंतानंद साईश यांनी ‘दिनू प्रतिदिनच उपवास करतो’, असे सांगणे आणि ते सत्य असल्याची दिनूला प्रचीती येणे
‘एकदा श्री अनंतानंद साईश यांच्या समोर एक कर्मठ ब्राह्मण आला आणि त्यांचे दर्शन घेऊन म्हणाला, ‘‘मी पूर्ण श्रावणमास उपवास करतो.’’ ते ऐकून श्री अनंतानंद साईश त्याला म्हणाले, ‘‘हमारा दिनू (टीप) तो हमेशा उपवास करता है ।’’ हे ऐकून दिनकरला वाटले, ‘मी तर दिवसातून ४ – ५ वेळा खातो आणि सद़्गुरु म्हणतात, ‘हा उपवास करतो’; पण दिनकरच्या मनात पूर्ण विश्वास होता की, सद़्गुरु म्हणतात, तेच बरोबर आहे.
टीप – श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. भक्तराज यांचे ‘भक्तराज’ असे नामकरण करण्यापूर्वीचे नाव ‘दिनकर’ होते.
एकदा दिनकर लोधीपुर्यातून रामजीकडे (प.पू. रामानंद महाराज यांच्याकडे) चालत (तेव्हा चालणे किंवा सायकलवरून फिरणे असायचे.) जात असतांना त्याला इंदूरमधील दोन्ही राजवाड्यांच्या मध्ये छापील कागदाचे एक पान दिसले. त्याने ते उचलून वाचले. ते संत तुकाराम यांच्या गाथेतील पान होते आणि त्यात लिहिले होते, ‘नाम घेता ग्रासोग्रासी तो नर जेवूनि उपवासी ।’ हे वाचल्यावर त्याला सद़्गुरूंचे शब्द आठवले आणि त्याचे मन शांत होऊन त्याला समाधान वाटले.
२. श्री अनंतानंद साईश यांनी दिनकरला भजने लिहिण्याची प्रेरणा होण्यासाठी प्रसंग घडवणे
२ अ. श्री अनंतानंद साईश यांनी दिनकरला एक वस्तू आणण्यासाठी एक रुपया देऊन पाच रुपयांचा हिशोब मागणे : दिनूला श्री भक्तराज महाराज होण्यापूर्वी भजन लिहिण्याचे ज्ञान मुळीच नव्हते. त्यांना ते ज्ञान आणि प्रेरणा त्यांच्या गुरूंकडून (श्री अनंतानंद साईश यांच्याकडून) मिळाली. ती प्रेरणा निर्माण करण्यासाठी काही वेळा सद़्गुरु वातावरण निर्माण करायचे. श्री भक्तराज म्हणजे सद़्गुरूंचा दिनू ! एकदा श्री गुरूंनी दिनूला एक रुपया देऊन बाजारातून काही वस्तू आणायला सांगितल्या. दिनूने वस्तू आणून देऊन राहिलेले पैसे सद़्गुरूंच्या समोर ठेवले. तेव्हा चिडून लालबुंद होऊन सद़्गुरु म्हणाले, ‘‘ये पैसे कम कैसे ? मैंने तो तुझे पांच रुपये दिये थे, बाकी रुपये (का हिसाब) कहां ?’’
२ आ. श्री अनंतानंद साईश यांच्यावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे दिनूला ‘ते योग्यच सांगत आहेत’, असे वाटणे; मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ न उमजल्याने तो मनातून घाबरणे : या वेळी तिथे असलेले लोक म्हणाले, ‘‘एकच रुपया दिला होता.’’ तेव्हा सद़्गुरु त्यांना म्हणाले, ‘‘इसका तुम्हें कुछ पता नहीं ।’’ दिनूचा पूर्ण विश्वास होता, ‘सद़्गुरु म्हणतात, तेच खरे आहे’; पण ते उमजले नसल्याने त्याला आतून घाबरल्यासारखे झाले. त्याच्या मनात सारखा विचार यायचा, ‘सद़्गुरूंनी ५ रुपयांचा हिशोब मागितला. तो कसा द्यायचा ?’ दुसर्या दिवशी श्री. दत्ता देशपांडे याला घेऊन दिनू (श्री भक्तराज महाराज) रामबागेतील मामा भांजेच्या दर्ग्याजवळील जागेवर एकांतात बसल्यावर त्याला भजन लिहिण्याची स्फूर्ती झाली आणि त्याने भजन लिहिले. ‘‘दयेच्या सागर नाथा । बुद्धीच्या दाता शांती द्या हृदया ॥’’ त्यात मुख्य लिहिले ते असे,
पंचतत्त्व देह चरणी खर्चिला ।
अहंकाराचा वारा भरला ।
तूची माय-बाप नाथा ।
नमितो माथा शांती द्या हृदया ॥
– (भजन क्रमांक ४६, दयेच्या सागर नाथा)
२ इ. सद़्गुरूंचे लक्ष दिनूला तत्त्वाशी समरस करण्याकडे असणे : ‘पंचतत्त्व देह गुरुचरणी अर्पिला’, याचा अहंकार झाला असेल; म्हणून श्री गुरूंनी असे वातावरण सिद्ध करून हे भजन लिहिण्याची स्फूर्ती दिली असेल. हे भजन सद़्गुरूंना म्हणून दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘हिसाब मिल गया ।’’ अशा प्रकारे सद़्गुरूंची दृष्टी दिनूला तत्त्वाशी समरस करण्याकडे असायची.
३. श्री अनंतानंद साईश यांनी दिनूने लिहिलेल्या भजनातील चुका सांगून त्याच्याकडून त्या सुधारून घेणे
‘मनाला लागो ही आस ।’, हे भजन दिनूने सद़्गुरूंसमोर म्हटले. पूर्ण भजन ऐकल्यावर सद़्गुरु म्हणाले, ‘‘इसमें तो तत्त्व लिखा ही नहीं ।’’ ते असे म्हणाल्यावर दिनू मनातल्या मनात पूर्ण भजन सारखे म्हणून विचार करायचा. असे करता करता एकदम त्याच्या लक्षात आले, ‘असे जो सार जिवाचा । करी रे नित्य जप त्याचा ॥’ याऐवजी ‘तत्त्व जो सार जिवाचा । करी रे नित्य जप त्याचा ॥’, अशी ओळ लिहून सद़्गुरूंसमोर भजन म्हणून दाखवावे.’ तसे केल्यावर सद़्गुरु म्हणाले, ‘‘अब ठीक है ।’’, अशा प्रकारे सद़्गुरूंचे लक्ष भजनातील चुकांकडेही होते.
४. श्री भक्तराज यांना सद़्गुरूंचा सहवास केवळ १ वर्ष १० मास मिळाला; पण या काळात त्यांनी दिनूला पूर्णत्व दिले. सद़्गुरु म्हणायचे, ‘‘मैं दिनूकी माला जपता हू्ं । मैंने उसको सबकुछ दिया ।’’
५. औषधविक्रीचा व्यवसाय करत असतांनाही सतत हरिचिंतनात असणारे आणि त्यामुळे भजने स्फुरून ते लिहिणारे प.पू. भक्तराज महाराज !
श्री भक्तराज महाराज त्रिशुल दंतमंजन, मनोहर चूर्ण, खोकल्याच्या गोळ्या, नेत्रबिंदू, चंद्रबिंदू, असे विकून संसार करत होते; पण हे सर्व करत असतांना त्यांचे सर्व लक्ष हरिचिंतन आणि भजन यांतच असायचे. असेच एकदा औषधे विकण्यासाठी ते मध्यप्रदेशातील धार आणि मांडव येथे गेले असतांना मार्गात त्यांनी ‘देवा, तुझेच मी लेकरू ।’ आणि ‘कसे आळवू मी ।’, ही भजने लिहिली अन् परत आल्यावर गुरूंना म्हणून दाखवली. एकदा मी त्यांच्या समवेत विक्रीसाठी इंदूरहून बसने उज्जैनला जाण्यास निघालो. आम्ही वाटेत ‘त्रिशुल दंतमंजन’ विकून पुढे बसने निघालो. बसमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने श्री भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘कागद आणि पेन दे.’’ त्यांनी माझ्या समोर ‘त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।’ हे भजन खाडाखोड न करता लिहिले. त्यांचे भजन लिहून झाल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘हे तुम्हाला कसे सुचले ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला हेे शब्द वरून आलेले दिसत होतेे. तेच मी लिहून काढले.’’
६. पूर्वसुकृत थोर असणारे प.पू. भक्तराज महाराज !
श्री अनंतानंद साईशांनी ४० वर्षे नर्मदेत उभे राहून तप केले. त्यांनी ते सर्व तप दिनूला देऊन दिनूचा ‘भक्तराज’ केला. तसे पाहिले, तर या जन्मात श्री भक्तराज यांनी काही तप केले नाही. याचाच अर्थ त्यांचे पूर्वसुकृत थोर होते.
– श्री. वसंत (अण्णा) धाडकर (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त), इंदूर, मध्यप्रदेश. (साभार : भक्तराज गारुडी आला)
माऊंट अबू येथील थोर संन्यासी संत श्री श्रद्धानंदजी यांनी श्री भक्तराज महाराज यांच्याकडे पाहून काढलेले उद़्गार !‘श्री. रणदिवे यांनी आम्हाला माऊंट अबू येथे त्यांच्या बहिणीकडे नेले. तिथे आम्हाला थोर संन्यासी संत श्री श्रद्धानंदजी यांचे दर्शन झाले. त्यांनी श्री भक्तराज महाराज यांच्याकडे पाहून उद़्गार काढले, ‘‘ट्रुथ इज ट्रुथ. फेथ इज फेथ अँड सोल इज सोल, इज रिअल सोल.’’ (Truth is Truth. Faith is Faith and Soul is Soul, is Real Soul.) नोकरी करतांना कधीही लाच न घेणारे श्री. हरिभाऊ लांभाते !‘श्री. हरिभाऊ लांभाते हे श्री भक्तराज महाराज यांचे लहानपणीचे मित्र. ते पोलीस निरीक्षक आणि चौकी ‘इन्चार्ज’ होते, तरी त्यांनी एकही काळा पैसा जवळ येऊ दिला नाही. एक घटना अशी, ‘एकाचे काम झाल्यावर त्याने हरिभाऊंना ५ रुपये दिले. ‘नको’ म्हणत असतांनाही त्यांनी बळजोरीने ते पैसे दिल्यावरही हरिभाऊंनी ते पैसे स्वीकारले नाहीत.’ प.पू. ज्ञानगिरी महाराज आणि श्री भक्तराज महाराज यांच्या भेटीचा अवर्णनीय सोहळा !‘आम्ही श्री. रणदिवे यांच्या बहिणीसह म्हैसाणा (गुजरात) येथे आलो. त्यांच्या बहिणीचे यजमान सरळ अहमदाबादला गेले. तिथे श्रीमंत ज्ञानगिरी महाराज होते. प.पू. ज्ञानगिरी महाराज यांना घेऊन ते परत म्हैसाण्याला आले. दिवाळीचा सण असल्याने घरात आनंदी आनंद होता. श्री भक्तराज महाराज आणि श्री संत ज्ञानगिरी महाराज यांच्या प्रथम भेटीचा तो सोहळा अवर्णनीय होता. पहिल्या भेटीतच श्री ज्ञानगिरी महाराज यांचे श्री भक्तराज महाराज यांच्यावर अपार प्रेम बसले. दिवाळी पाडव्याच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशी त्यांनी श्री भक्तराज महाराज यांच्यासाठी घातलेल्या स्वच्छ गादीवर श्री भक्तराज यांना बसवले आणि म्हणाले, ‘‘भक्तराज महाराज, आम्ही तुम्हाला गादीचा अधिकार देत आहोत. आता तुम्ही या जगात निर्भय होऊन रहायचे.’’ हा सोहळा अगदी अवर्णनीय आणि पहाण्यासारखा होता.’ – श्री. वसंत (अण्णा) धाडकर (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त), इंदूर, मध्यप्रदेश. (साभार : भक्तराज गारुडी आला) |
|