भारताच्‍या पहिल्‍या महिला गुप्‍तहेर सैनिक नीरा आर्या !

आज ८ मार्च २०२३ या दिवशी ‘आंतरराष्‍ट्रीय महिलादिन’ आहे. त्‍या निमित्ताने…

नीरा आर्या

भारताच्‍या स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्‍या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. देशाच्‍या स्‍वातंत्र्यात योगदान देणार्‍या अनेक व्‍यक्‍तींना इतिहासाच्‍या पानात जाणूनबुजून लुप्‍त केले गेले. आज जेव्‍हा त्‍याच कुटुंबाची पुढची पिढी तो इतिहास न वाचता बेताल वक्‍तव्‍य करते तेव्‍हा त्‍यांच्‍या बुद्धीची कीव येते. ब्रिटीश काळात काळ्‍या पाण्‍याची शिक्षा काय असते ? हे ठाऊक नसलेले अनेक जण त्‍याविषयी स्‍वतःच्‍या अकलेचे तारे तोडत असतात. त्‍याच अंदमानच्‍या काळोखी भिंतीत इतिहासाचे एक पान लुप्‍त केले गेले, ज्‍याविषयी आजही भारतियांना काहीच ठाऊक नाही. ही गोष्‍ट आहे एका ‘नीरा’ची, जिने अपरिमित यातना भोगतांनाही देशाशी गद्दारी (देशद्रोह) केली नाही. ही गोष्‍ट आहे एका नीराची जिने देशासाठी स्‍वतःच्‍या पतीचे प्राण घ्‍यायलाही मागे-पुढे बघितले नाही. ही गोष्‍ट आहे एका नीराची जिने भारताच्‍या स्‍वातंत्र्यासाठी स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा केली नाही; पण स्‍वतंत्र भारतात तिच्‍यावर अक्षरशः झोपडीत रहाण्‍याची वेळ आणली गेली; कारण इतिहासाची अशी कित्‍येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणूनबुजून लुप्‍त करण्‍यात आली.

श्री. विनीत वर्तक

१. नीरा आर्या यांचे शिक्षण आणि आझाद हिंद सेनेत प्रवेश

५ मार्च १९०२ या दिवशी उत्तरप्रदेशातील बागपत जिल्‍ह्यात नीरा आर्या यांचा जन्‍म झाला. एका सुखवस्‍तू कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या नीरा यांचे शिक्षण कोलकातामध्‍येे झाले. लहानपणापासून त्‍यांच्‍यात देशभक्‍ती भिनलेली होती. देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी त्‍या आपल्‍या प्राणाची आहुती द्यायलाही सज्‍ज होत्‍या. शालेय शिक्षण झाल्‍यावर देशप्रेमाचे वेड त्‍यांना स्‍वस्‍थ बसू देईना. त्‍याच ओढीतून त्‍यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या आझाद हिंद सेनेतील ‘झाशी राणी रेजिमेंट’मध्‍ये प्रवेश घेतला. नेताजींनी त्‍यांच्‍यावर सरस्‍वती राजामणी यांच्‍यासह हेरगिरी करण्‍याचे दायित्‍व दिले. त्‍या देशाच्‍या पहिल्‍या गुप्‍तहेर सैनिक बनल्‍या. कधी मुलगी, तर कधी पुरुष बनून ब्रिटीश अधिकारी आणि इंग्रजांच्‍या सैनिकी तळांमधील गोष्‍टी त्‍या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्‍या. त्‍यांचे देशकार्य घरच्‍यांना कळू न देता चालू  होते.

२. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवण्‍यासाठी पतीचा कोथळा बाहेर काढणार्‍या नीरा आर्या !

त्‍यांच्‍या या गुप्‍तहेर कार्याची माहिती नसलेल्‍या घरच्‍यांनी त्‍यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठित अशा ब्रिटीश सेनेतील एका अधिकार्‍याशी त्‍यांचे लग्‍न जमवले. त्‍या अधिकार्‍याचे नाव होते श्रीकांत जय राजन दास ! लग्‍नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्‍यांच्‍या आणि त्‍यांच्‍या नवर्‍याच्‍या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना नीराच्‍या वेगळ्‍या रूपाविषयी कल्‍पना आली. ‘नीरा ब्रिटीश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेला साहाय्‍य करत आहे’, हे समजल्‍यावर त्‍यांनी तिला नेताजींविषयी विचारण्‍यास प्रारंभ केला. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्‍यासाठी तिच्‍यावर अनेक प्रकारे बळजोरी केली; पण नीरा कशाला दबल्‍या नाहीत. उलट नीरा यांनी अजून वेगाने स्‍वातंत्र्यलढ्यात स्‍वतःला झोकून दिले. एके दिवशी महत्त्वाची माहिती नेताजींना कळवण्‍यासाठी नीरा या एका गुप्‍त भेटीसाठी निघाल्‍या असतांना याची माहिती श्रीकांत दास यांना लागली. त्‍यांनी गुपचूप नीरा यांचा पाठलाग केला. नेताजींशी भेट होत असतांना श्रीकांत यांनी त्‍यांच्‍या दिशेने गोळी झाडली; पण ती गोळी नेताजींच्‍या वाहनचालकाला लागली. पुढे काय होणार, याचा नीरा यांना अंदाज आला. एका क्षणाचाही विलंब न करता नीरा यांनी आपल्‍याजवळ असलेल्‍या चाकूने स्‍वतःच्‍या जोडीदाराचा म्‍हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला.

३. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्‍यास नकार दिल्‍यावर जेलरने नीरा यांना दिलेली अघोरी शिक्षा !

एका ब्रिटीश अधिकार्‍याची हत्‍या केल्‍याप्रकरणी सरकारने नीरा आर्या यांना काळ्‍या पाण्‍याच्‍या जन्‍मठेपेच्‍या शिक्षेसाठी सेल्‍युलर जेल म्‍हणजेच अंदमानमध्‍ये पाठवले. तेथे चालू झाला एक अत्‍याचाराचा न संपणारा प्रवास ! हाडे गोठवणार्‍या थंडीत छोट्याशा कारागृहात त्‍यांच्‍यावर प्रतिदिन अत्‍याचार करण्‍यात येत होते. साखळदंडात अडकवलेल्‍या हातापायांच्‍या बेड्यांनी चामडी सोलून हाडे घासत होती; पण ब्रिटिशांचे अत्‍याचार संपत नव्‍हते. एक दिवस जेलरने (कारागृह अधिकार्‍याने) त्‍यांच्‍याकडे प्रस्‍ताव (ऑफर) दिला की, ‘जर तुम्‍ही नेताजींचा ठावठिकाणा सांगितला, तर तुला आम्‍ही या जाचातून मुक्‍त करू’; पण यावर नीरा यांनी एकही शब्‍द बोलण्‍यास नकार दिला. ‘नेताजी कुठे असतील ?’, या प्रश्‍नावर ‘ते माझ्‍या हृदयात आहेत’, या उत्तराने चवताळलेल्‍या त्‍या जेलरने नीरा यांचे कपडे फाडले. तिथल्‍या लोहाराला बोलावून चिमटीने नीरा यांचा उजवा स्‍तन कापायचा आदेश दिला. त्‍या लोहाराने क्षणाचा विलंब न करता नीरा आर्या यांचा उजवा स्‍तन कापला. ‘पुन्‍हा मला उलट बोललीस, तर तुझा डावा स्‍तनही शरिरापासून वेगळा करीन’, असे त्‍याने बजावले; पण त्‍यावरही नीरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्‍यांच्‍याविषयी एक शब्‍दही बोलण्‍यास नकार दिला.

४. स्‍वातंत्र्योत्तर काळात नीरा आर्या यांनी जगलेले खडतर आयुष्‍य

भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर अंदमान कारागृहातून त्‍यांची मुक्‍तता करण्‍यात आली. चुकीचा इतिहास सांगणार्‍या लोकांनी पद्धतशीरपणे नीरा आर्या यांचे बलीदान इतिहासाच्‍या पानात लुप्‍त केले. देशासाठी स्‍वतःच्‍या जोडीदाराची हत्‍या करणारी आणि वेळप्रसंगी स्‍वतःच्‍या स्‍तनाचे बलीदान करणारी रणरागिणी भारतियांच्‍या नजरेत पुन्‍हा कधीच आली नाही. आपल्‍या आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या काळापर्यंत सरकारी भूमीवर उभ्‍या केलेल्‍या एका अनधिकृत झोपडीत त्‍यांनी भाग्‍यनगरच्‍या (हैद्राबादच्‍या) रस्‍त्‍यांवर फुले विकत स्‍वतःचे आयुष्‍य काढले. देशासाठी स्‍वतःचे सर्वोच्‍च बलीदान देणार्‍या नीरा आर्या २६ जुलै १९९८ या दिवशी अनंतात विलीन झाल्‍या. सरकारने त्‍यांची झोपडीही बुलडोझर चालवून भुईसपाट केली. ‘नीरा यांचा साधा सन्‍मान करण्‍याची मानसिकता गेल्‍या ७५ वर्षांत भारत सरकार दाखवू शकलेले नाही’, हा एक भारतीय म्‍हणून आपला पराजय आहे.

५. क्रांतीकारकांचा सन्‍मान कधी ?

इकडे टुकार चित्रपटात काम करणारे अभिनेते (हिरो) आणि तळवे चाटणारे लोक जेव्‍हा ‘पद्म’ पुरस्‍काराचे मानकरी ठरतात, तेव्‍हा इतिहासाच्‍या पानात लुप्‍त झालेल्‍या अशा अनेक अनाम विरांचा सन्‍मान करायला आपण आजही विसरतो आहोत, याची जाणीव होते. तोंडात सोन्‍याचा चमचा घेऊन जन्‍माला आलेले काही वाचाळवीर राजकारणी जेव्‍हा सेल्‍युलर जेलमधील शिक्षेविषयी बेताल वक्‍तव्‍य करतात, तेव्‍हा त्‍यांना सांगावेसे वाटते, ‘‘ज्‍या स्‍तनातून दूध पिऊन तुम्‍ही या जगात आला, त्‍या स्‍तनाला स्‍त्रीच्‍या शरिरापासून वेगळे करतांना काय यातना झाल्‍या असतील ? याचा थोडा विचार करा.’’

धन्‍य तो भारत ज्‍यात नीरा आर्या यांच्‍यासारख्‍या स्‍त्रिया जन्‍माला आल्‍या, धन्‍य ते नेताजी ज्‍यांनी देशासाठी स्‍वतःच्‍या प्राणापलीकडे जीव देणारी असे क्रांतीकारी आणि आझाद हिंद सेना उभी केली, धन्‍य ती आझाद हिंद सेना ज्‍या सेनेत नीरा आर्या यांच्‍यासारख्‍या सैनिकांनी स्‍वतःचे योगदान दिले. फक्‍त करंटे आम्‍ही ज्‍यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला, करंटे आम्‍ही ज्‍यांनी ७५ वर्षांत अशा लोकांचे कौतुक कधी केले नाही, करंटे आम्‍ही ज्‍यांना भारताचा स्‍वातंत्र्य लढा कधी समजलाच नाही. नीरा आर्या यांचा जीवनपट उलगडणारा एक चित्रपट येतो आहे. अर्थात् त्‍यात कितपत खर्‍या गोष्‍टी दाखवल्‍या जातील ? याविषयी शंका आहे; पण भारताच्‍या या पहिल्‍या गुप्‍तहेर नीरा आर्या यांना साष्‍टांग दंडवत !’

– श्री. विनित वर्तक, अभियंता, मुंबई. (१८.१२.२०२२)

(श्री. विनित वर्तक यांच्‍या ‘ब्‍लॉग’वरून साभार)

संपादकीय भूमिका

  • देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर क्रांतीकारकांना उपेक्षित जीवन जगावे लागणे, हे भारतियांना लज्‍जास्‍पद !